वर्षपुर्ती : विशेष वृत्त
वर्षभरात जिल्ह्यातील 39946 शेतक-यांना सरकारतर्फे 163.11 कोटी प्रोत्साहनपर लाभ
Ø महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
चंद्रपूर, दि. 22 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतक-यांसाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर लाभ योजना अंमलात आणली आहे. गत वर्षभरात जिल्ह्यातील 39946 शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला असून राज्य सरकारतर्फे 163 कोटी 11 लक्ष रुपये प्रोत्साहनपर रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
जिल्ह्यात शासनाच्या पोर्टलद्वारे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 57357 शेतक-यांचे कर्ज खाते तसेच राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक आणि इतर व्यापारी बँकेतील 11078 कर्ज खाते असे एकूण 68435 खाते अपलोड करण्यात आले. शासनस्तरावरून आतापर्यंत 41951 पात्र लाभार्थी यादी विशिष्ट क्रमांकासह प्रसिध्द झाली आहे. यापैकी 40851 शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली असून 1100 पात्र शेतक-यांनी ईकेवायसी / आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली नाही. आधार प्रमाणीकरण झालेल्या 40851 शेतक-यांपैकी 39946 शेतक-यांच्या बँक खात्यात शासनाकडून 163 कोटी 11 लक्ष रुपये प्रोत्साहनपर लाभ म्हणून जमा करण्यात आले आहेत.
प्रोत्साहनपर योजनेंतर्गत सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेले शेतकरी या योजनेस प्रात्र आहेत. प्रोत्साहनपर लाभ देतांना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. सदर योजनेंतर्गत विशिष्ट क्रमांकासह लाभार्थी शेतक-यांची यादी शासनाकडून पोर्टलवर प्रसिध्द करण्यात येते. त्यानंतर लाभार्थी शेतक-यांनी आपले सरकार / सेवा केंद्रावर जावून आधार प्रमाणीकरण केल्यानंतर संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा होते.
प्रोत्साहनपर लाभ योजनेचे निकष : 1. कर्जमुक्तीचा लाभ देत असतांना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात आला आहे. 2. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतक-यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात आले आहे. 3. सन 2019 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुध्दा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील, असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment