Search This Blog

Monday 15 July 2019

2020 च्या गणेश स्थापनेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र गॅसयुक्त, धूरमुक्त करण्याचे नियोजन : ना.सुधीर मुनगंटीवार




जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ
v 15 ऑगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्हा धूरमुक्त व गॅसयुक्त करण्याचा संकल्प
v प्रधानमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्ह्यात काम करण्याचे निर्देश
v जनप्रतिनिधी व प्रशासनाने 29 दिवसात उद्यिष्ट्य पर्ण करावे.
चंद्रपूर दि. 15 जुलै : गरीब, वंचित कुटुंबांना 100% एलपीजी गॅस कनेक्शन देणे, शंभर टक्के कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करणे व सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप करण्याच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 2020 च्या गणेश स्थापनेपर्यंत संपूर्ण राज्य धूरमुक्त व गॅस युक्त करण्याचे शासन नियोजन करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी केली.
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीनही घटकांमधील लाभार्थ्यांना यावेळी पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते एलपीजी कनेक्शन, शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे पशुसंवर्धन  दुग्धविकास, मत्स्यविकास विभागाचे प्रधान सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, अर्चनाताई जिवतोडे, वरोराचे नगराध्यक्ष ऐतशाम अली, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
40 लाख कुटुंबांना गॅस देणार
यावेळी संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधुनिक काळामध्ये आजही आपल्या गावातील आई-बहिणींना आरोग्याला विघातक असणाऱ्या धुरापासून अनेक भागात संरक्षण नाही. आजही लाकूडफाटा जमा करून चुलीवर स्वयंपाक केला जातो. महाराष्ट्रामध्ये सध्या 40 लाख कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही. त्या सर्व कुटुंबांना गॅस युक्त करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाचा असून त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यरत झाला आहे. आता शासन अतिशय सकारात्मक असतांना  यासंदर्भातील उद्दिष्टपूर्ती लवकरात लवकर झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
जनप्रतिनिधींना सेवेची संधी देणारे अभियान
यावेळी उपस्थित जनप्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले, मूलभूत गरजांनी गरिबांना समृद्ध करणारे हे अभियान आहे. शेवटच्या वंचित माणसाच्या आयुष्यात आनंद देणारी ही योजना आहे. योजनेबाबत अतिशय सक्रियतेने व नोंदी ठेवत काम करावे, प्रत्येक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रभागांमध्ये कोणत्या कुटुंबाकडे गॅस नाही आहे याची नोंद असली पाहिजे. ज्यांच्याकडे गॅस नाही, शिधापत्रिका नाही व ज्यांना दोन व तीन रुपये किलो रुपयाचे धान्य मिळत नाही, अशा सर्व कुटुंबांच्या याद्या या जनप्रतिनिधींनी देखील स्वतःकडे ठेवाव्यात. त्यांना ही सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. या जनप्रतिनिधींना प्रशासन सहकार्य करेल. कोणी अडचण आणत असेल तर ती आपण दूर करू. त्यामुळे आपला जिल्हा पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या कार्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात अग्रेसर असावा. चांदा ते बांदा असे महाराष्ट्राचे वर्णन केल्या जाते त्यामुळे या योजनेचा चेहरा चंद्रपूर जिल्हा बनवा व चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के गॅस वाटप, शिधापत्रिका वाटप व अन्नधान्य वाटपाचे अभियान यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी केले.
15 ऑगस्टला उद्दिष्ट्यपूर्ती करा…
 त्यांनी यावेळी जनप्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले की, गरीबांच्या कामी येणे, हेच आमच्या राजकीय जीवनाचे उद्दिष्ट असते. पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय हे अभियान अतिशय पुण्याचे काम असून आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येकाला याचा लाभ मिळेल, यासाठी अतिशय जागरूकतेने काम करावे. गरीबातल्या गरिबांना उत्तम प्राथमिक सुविधा, रेशन कार्ड, पिण्याचे पाणी व त्यांना आरोग्याच्या उत्तम सुविधा, शिक्षण देताना सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास या त्रिसूत्रीचा वापर करावा. 15 ऑगस्टपर्यत जिल्हयात प्रशासन व जनप्रतिनिधीनी मिळून उद्दिष्टयपूर्ती करावी, असा कालबद्ध कार्यक्रमही त्यांनी दिला
प्रधानमंत्र्यांनी घ्यावी चंद्रपूरची नोंद…
      अभियानाची सुरुवात आपल्या जिल्ह्यापासून करायची असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील चंद्रपूर जिल्ह्यातील या क्षेत्रात केलेल्या कामाचा उल्लेख अभिमानाने मन की बात मध्ये करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे अतिशय रचनात्मक काम असून पुढचे 29 दिवस झोकून काम करून चंद्रपूर जिल्हा धूरमुक्त जिल्हा झाल्याची घोषणा 15 ऑगस्ट रोजी आपल्याला करता आली पाहिजे यासाठी सर्व पद्धतीचे नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
25 गावांमध्ये गरम पाण्याचा पथदर्शी प्रयोग
पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत या अभियाना मधून गॅस कनेक्शन एकदा दिले जाईल मात्र गॅसवर रोज आवश्यक असणाऱ्या गरम पाण्यात तापवणे पुरवठा येणार नाही अशी भीती अनेकांना आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी गावामध्ये गरम पाणी करण्यासाठी सोलर योजनेचे प्रयोग करण्यात आले आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील 25 गावांमध्ये गरम पाणी करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल व त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात देखील निकषांवर आधारित प्रकल्प सुरू केल्या जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे संचालन माधुरी संतोषराव यांनी तर प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर व सादरीकरण भारतकुमार तुंगडे यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment