वरोरा येथे दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल वितरणाचा कार्यक्रम
चंद्रपूर दि.11 जुलै - चंद्रपूर जिल्हयात एक हजार दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल देण्याचे जरी आपण जाहीर केले असले, तरीही जिल्हयातील शेवटच्या दिव्यांगाला सायकल मिळेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. 80 टक्के दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग बांधवांना शासनातर्फे घरकुल बांधून देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद सुध्दा करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांसाठीच्या अनुदानात सहाशे रूपयावरून एक हजार रूपये इतकी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दिनांक 11 जुलै रोजी वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आयोजित अटल दिव्यांग स्वावलंबन मिशन अंतर्गत दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष अहेतेशाम अली, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, एसीसी चे महाप्रबंधक श्री. खटी, वरोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. बल्लाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्या आनंदवन परिसरात हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या आनंदवनातून जाताना माणूस आनंद घेवून जातो व तो आनंद इतरांनाही देण्याचा प्रयत्न करतो. कर्मयोगी कै. बाबा आमटे यांची ही कर्मभूमी नेहमीच दिव्यांगांना आत्मनिर्भरतेचा संदेश देत आली आहे. हाच संदेश पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे दिव्यांग व्यवसाय करू इच्छीतात त्यांना बॅटरी ऑपरेटेड वाहने अर्थात शॉप ऑन व्हेईकल देण्याचा निर्णय सुध्दा आम्ही केला आहे. त्या माध्यमातून भाजी विक्री, पेपर विक्री व अन्य व्यवसाय ते करू शकतील. संजय गांधी निराधार योजना तसेच सामाजिक अर्थसहाय्याच्या अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना अर्थात वृध्द, निराधार, दिव्यांग आदींना दोन महिन्यात अनुदानाचे पैसे न दिल्यास विलंबाला जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा ईशारा यावेळी बोलताना त्यांनी दिला. विधवा व निराधार महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या. यादृष्टीने विशेष कार्यक्रम शासन राबविणार असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. विकास आमटे म्हणाले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाला असून यापूर्वी कधी नव्हे इतका विकास जिल्हयातील नागरिक अनुभवत आहे. विशेषतः दिव्यांगांच्या चेह-यावर आनंद निर्माण व्हावा यासाठी ते गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहे. आनंदवन परिवार याचा साक्षीदार असल्याचेही विकास आमटे यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी ब्रिजभूषण पाझारे, हरीश शर्मा आदींची भाषणे झालीत. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. 0000
No comments:
Post a Comment