घरकुल वाटप दिव्यांग व रेन वॉटर हार्वेस्टिंग करिता अनुदान वाटप सोहळा
चंद्रपूर, दि. 11 जुलै: असंख्य शहरात पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असून मानवाचे मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात पाण्याच्या एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रू गाळावे लागतील. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं चंद्रपूर शहर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी साठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन लोक चळवळीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करत आहे. ही कौतुकाची बाब असून शहरातील दिव्यांगांना अनुदान तसेच निवार्या पासून वंचित असलेल्या जनसामान्यांना घरकुल योजना राबवली जात आहे. यात सातत्य ठेवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आपले अधिकार लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरावे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 11 जुलै रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकाद्वारे आयोजित घरकुल हस्तांतरण रेनवॉटर हार्वेस्टिंग व दिव्यांगाकरिता अनुदान वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ शामकुळे, महानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, सभागृहाचे गटनेते वसंताभाऊ देशमुख, महिला व बालकल्याण सभापती शितल गुरनुले, सभापती कल्पना बाबुलकर, सभापती सुरेश पचारे, सभापती प्रशांत चौधरी, उपसभापती चंद्रकला सोयाम मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
देशातील जनसामान्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री यांचा आग्रह असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लोकांना हक्काचं घर मिळत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच टक्के निधी दिव्यांगांना स्वतःचा रोजगार उभा करण्याकरिता अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे. सोबतच असंख्य शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला जात असताना महानगरपालिकेच्या पुढाकाराने रेन वॉटर हार्वेस्टिंग ची लोकचळवळ यशस्वीरित्या राबवली जात आहे. या तीनही आघाड्यांवर महानगरपालिका यशस्वीरित्या काम करत आहे. ही प्रशंसनीय बाब असून याची दखल देशपातळीवर घेतली जाईल. अशा अशा पद्धतीने चंद्रपूर महानगरपालिकेने काम करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
नद्यांच्या किनाऱ्यावरच मनुष्य सृष्टी तयार झाली. मानवाने नदीला माता मानलं. परंतु आज आज प्रचंड पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून पाणी पैशा सारखं खर्च केलं पाहिजे, असा सल्ला देण्याची वेळ आलेली आहे. पाणी शोधण्यासाठी मानव मंगळावर पोहोचलेला असून भविष्यात पाण्याचे एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रुचे थेंब गाळावे लागतील, अशी भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काही शहरांना रेल्वेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी आपण किती वर्षे पदावर राहतो. त्यापेक्षा मनुष्य य व वसुंधरेची किती सेवा केली. हे फार महत्त्वाचं असून पावसाचा प्रत्येक थेंब भूमातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी पक्षपात विसरून महानगरपालिकेच्या रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच या मोहिमेची शहरातील लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करणाऱ्या इको प्रो या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
चंद्रपूर शहरातील विहिरींचे नूतनीकरण करावे तसेच बोरवेल नादुरुस्त असतील तर त्या दुरुस्त कराव्या. याकरता लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अर्थसंकल्पात राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना घरकुल दिनाकरिता तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांनाही स्वतःचा रोजगार निर्माण करता यावा याकरिता इलेक्ट्रॉनिक वेहिकल च्या माध्यमातून चालतं फिरतं दुकान एक हजार लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यापैकी शंभर वाहन चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांगांना वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना किराणा, हस्तकला, भाजीपाला, खाण्याच्या वस्तू इत्यादींचे दुकान लावून स्वतःचा रोजगार निर्माण करता येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी प्रस्तावना सादर करताना चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवले जाणारे विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 20 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी पात्रतेत बसणाऱ्या 15 हजार कुटुंबांना हक्काचं घर महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या सोहळ्यात घरकुल, रेनवॉटर हार्वेस्टिंग व दिव्यांगांना अनुदान योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी नानाभाऊ शामकुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महानगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध योजनांचे लाभार्थी, पत्रकार तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment