चंद्रपूर, दि. 20 जुलै: केंद्रशासनातर्फे राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार असून यामध्ये उद्योग, व्यवसाय व सेवा यांची प्रत्यक्ष कुटुंबास तसेच उद्योगास भेट देऊन गणना करण्यात येणार आहे. ही गणना जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, एनआयसीचे प्रमुख सतिश खडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमीत सुतार, सीएससीचे विभागीय प्रभारी निलेश कुंभारे, नगर परिषदेचे सर्व मुख्याधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आर्थिक गणना दर पाच वर्षांनी होत असून यापूर्वी 2013 साली करण्यात आली होती. यावर्षी आर्थिक गणना ही प्रथमच पेपरलेस पद्धतीने ॲपद्वारे राबवण्यात येणार आहे. या गणनेत उद्योग, रोजगार, कामगारांची संख्या, नोकरदार, स्वयंरोजगार,कामगार पणन संस्था, वस्त्रोद्योग, शाळा, महाविद्यालयांची संख्या, कुटुंबांचा आर्थिक स्थर, संकलित महसूल, आदी घटकांची गणना केली जाणार आहे. सदर गणेनेसाठी जिल्ह्यात 1892 प्रगणक व 473 पर्यवेक्षकांची आवश्यकता भासणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा पास करावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनाच प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून कॉमन सर्विस सेंटर कडून निवड करण्यात येईल. हे प्रगणक प्रत्येक कुटुंबात पर्यंत पोहोचणार आहे.
या गणनेवर संनियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यस्तरीय समितीशी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत आर्थिक गणनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्या कार्यालयांना सहकार्य करण्याबाबत सूचना देणे, स्थानिक प्रशासन व पंचायत यांना वेळोवेळी मार्गदर्शनात्मक सूचना करणे, राज्यस्तरीय समन्वय समितीला अवगत करणे, गणनेचा जिल्हास्तरीय अहवाल मंजूर करणे व प्रचार प्रसिध्दीची कामे करण्यात येईल. प्रगणक तसेच पर्यवेक्षकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment