Search This Blog

Friday 1 March 2024

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून नगर परिषदांना 25 कोटींचा निधी मंजूर

      


    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून नगर परिषदांना 25 कोटींचा                                                    निधी मंजूर

           

Ø  मूल, बल्लारपूर आणि पोंभुर्णासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विशेष अनुदान 

 

चंद्रपूर, दि. 1 :  जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सदैव प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मूल, बल्लारपूर नगर परिषद आणि पोंभुर्णा नगर पंचायतीकरीता वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विशेष अनुदानातून 25 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय 29 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला.

राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. या अंतर्गत बल्लारपूर नगर परिषदेकरीता 12 कोटी 34 लक्ष 97 हजार रुपये, मूल नगर परिषदेकरीता 6 कोटी 25 लक्ष 3 हजार रुपये आणि पोंभुर्णा नगर पंचायतीकरीता 6 कोटी 40 लक्ष रुपये, असे एकूण 25 कोटी रुपये मंजूर झाले आहे.

बल्लारपूर नगर परिषद अंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये खुल्या जागांचा विकास करणे, खुल्या जागेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, बल्लारशहा वेकोली संकूलात व्हॉलीबॉल ग्राऊंडचे बांधकाम करणे, स्प्रिंकलर आणि पाणी व्यवस्थापन करणे, सेपरेटर गॅलरीचे बांधकाम करणे, नवीन टॉयलेट ब्लॉक आणि चेंजींग रूमचे बांधकाम, विद्यमान पॅव्हेलियनचे इमारतीचे नुतनीकरण करणे आणि वेकोली संकूलात क्रीडा व पायाभूत सुविधांचा विकास करणे, तेलगू समाज स्मशानभुमीचा विकास करणे तसेच सी.सी. रोड बांधकाम करणे आदी कामांसाठी बल्लारपूर नगर परिषदेला 12 कोटी 34 लक्ष 97 हजार रुपये मिळणार आहे.

मूल नगर परिषदेअंतर्गत मटन मार्केट येथे मैला शुध्दीकरण उभारणी, न.प. अंतर्गत विविध रस्त्यांचे बांधकाम, विविध प्रभागातील सी.सी.रोड, लादीकरण व नाली बांधकाम, खुल्या जागांचा विकास करणे यासाठी मूल नगर परिषदेला 6 कोटी 25 लक्ष 3 हजार रुपये मंजूर झाले आहे. तर पोंभुर्णा नगर पंचायतीकरीता 6 कोटी 40 लक्ष रुपये मंजूर झाले असून यात अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, नाल्यांचे बांधकाम, नगर पंचायतीकरीता डस्टबीन खरेदी करणे, शहरात वाढीव विद्युत खांब बसविणे, पाणी पुरवठा विहिरीचा गाळ काढणे व विहीर दुरुस्ती करणे तसेच पाणी पुरवठा योजनेकरीता वाढीव मोटारपंप खरेदी करणे आदी कामांचा समावेश आहे.

उपरोक्त तीनही नगर परिषद / नगर पंचायतीला पायाभूत सुविधांकरीता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

000000

No comments:

Post a Comment