Search This Blog

Sunday 17 March 2024

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर - जिल्हाधिकारी विनय गौडा





मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 36 हजार 314 मतदार

Ø 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना घरून मतदानाची सोय

Ø नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक कार्यान्वित

चंद्रपूर दि. 17 : केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 13 - चंद्रपूर लोकसभा  मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडी जी.सी. यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात मतदार जनजागृतीकरीता स्वीप योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्हा प्रशासनातर्फे सायकल रॅली, मिनी मॅरेथॉन व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यापुढेही जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा, यावर जनजागृती करण्यात येईल. ज्या ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते, तेथे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आदर्श आचार संहिता व निवडणूक खर्च पथकांची स्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 42 फिरते निगराणी पथक (एफ.एस.टी.), 62 स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.), 29 व्हिडीओ निगराणी पथक (व्ही.व्ही.टी.) , 9 व्हीडीओ पाहणी पथक (व्ही.एस.टी.) 6 खर्च पथक आणि 6 खर्च सनियंत्रक पथक स्थापन करण्यात आले आल्याचे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सांगितले.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 18 लक्ष 36 हजार 314 मतदार : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून एकूण 18 लक्ष 36 हजार 314 मतदार आहेत. यात 9 लक्ष 45 हजार 26 पुरुष मतदार, 8 लक्ष 91 हजार 240 स्त्री मतदार आणि इतर 48  जणांचा समावेश आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 36 हजार 388 पुरुष मतदार, 1 लक्ष 34 हजार 840 स्त्री मतदार असे एकूण 2 लक्ष 71 हजार 228 मतदार आहेत. तर चिमूर विधानसभा मतदार संघात 1 लक्ष 40 हजार 197 पुरुष मतदार, 1 लक्ष 36 हजार 627 स्त्री मतदार असे एकूण 2 लक्ष 76 हजार 824 मतदार आहेत. तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 18 ते 19 वयोगटात एकूण 24120 मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या 2044 असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 2118 मतदान केंद्र आहेत.

85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार व दिव्यांग मतदार :13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले 7117 पुरुष मतदार आणि 9504 स्त्री मतदार असे एकूण 16621 मतदार आहेत. तसेच गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 85 व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 2403 तर चिमूर विधानसभा मतदार संघात हा आकडा 2594 आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 9679 दिव्यांग मतदार आहेत. यात 6164 पुरुष दिव्यांग तर 3515 स्त्री दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40  टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारास गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारास 12 डी नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक– 2024 करीता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07172- 271617 आहे. सोशल मिडीया नियंत्रण व तक्रारीकरीता पोलिस विभागातर्फे 8888511911 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून 24 बाय 7 कार्यरत राहणार आहे. याशविाय जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रार निवारण / मदत कक्ष, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तक्रार निवारण / मदत कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1950 असून आदर्श आचार संहिता कक्षाचा क्रमांक 8788510061 आहे. तसेच सी-व्हिजील / ई.एस.एम.एस. या ॲप वरही तक्रार नोंदविता येणार आहे.

००००००

1 comment:

  1. EVM ची माहिती बालवयातच मुलांना व्हावी या साठी जि.प.उ.प्रथा.शाळा, पालगाव पं स. कोरपना येथे प्रत्यक्ष शालेय मंत्रिमंडळ ची निवडणूक EVM द्वारे घेण्यात आली. त्या संदर्भातील Youtube Video
    👇👇👇👇👇👇👇👇
    https://youtu.be/hRU6MGIE-BQ?si=iCS-GDFBXTJtWcQ4

    ReplyDelete