आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
Ø कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे दिले निर्देश
चंद्रपूर, दि. 13: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आगामी 2023 हे वर्ष जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्याअनुषगांने सदर कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.
बैठकीला प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, मनपा उपायुक्त अशोक गराटे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण,कृषी विकास अधिकारी श्री. दोडके, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार,कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विनोद नागदेवते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ज्वारी या पिकासोबतच बाजरी व नाचणी आरोग्यास लाभदायक असुन या पिकासाठी पाणीसुद्धा कमी लागते.त्यामुळे या पिकांची पेरणी क्षेत्रवाढ कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे. पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे नियोजन वर्षभरात विविध विभागामार्फत करण्यात येणार असून यामध्ये विभागांचा सहभाग व त्यांची जबाबदारी काय असेल याबाबतचा आराखडा तयार करुन नियोजन करण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या.
भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा एक प्रमुख देश आहे. यानिमित्त पुढीलवर्षी देश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंतच्या सर्व स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा व राजगिरा आदी पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्य विषयक फायद्यांबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हा प्रमुख हेतू आहे.
शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेअंतर्गत प्रत्येक शेतावर पौष्टिक तृणधान्य घेण्यासाठी या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य पिकांचे बियाणे मिनी किट उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. भौगोलिक परिस्थिती व हंगाम यांचा विचार करून पौष्टिक तृणधान्य पिकाचे बियाणे मिनी किट वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी कृषी विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
00000
No comments:
Post a Comment