Search This Blog

Tuesday, 31 January 2023

सुकन्या समृद्धी योजनेसाठी डाक विभागाचे विशेष अभियान


 सुकन्या समृद्धी योजनेसाठी डाक विभागाचे विशेष अभियान

Ø 9 व 10 फेब्रुवारी या कालावधीत उघडता येणार खाते 

चंद्रपूर, दि. 31 : सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना फक्त मुलींसाठी असून केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे. मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना या योजनेची गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. पोस्ट विभागाद्वारे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याचे अभियान दि. 9 व 10 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत आहे.

केंद्र आणि राज्यशासनाद्वारे बँका किंवा पोस्ट ऑफिसमार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना ही मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे. यामध्ये मुलींच्या आईवडिल यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात.

ही आहेत योजनेची वैशिष्ट्ये:

सर्वात कमी 250 रुपये भरून सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालू करता येते.  10 वर्षाखालील मुलीचे खाते,मुलीचे आई-वडील अथवा कायदेशीर पालकाद्वारे उघडता येते. एका मुलीकरीता केवळ एकच खाते स्वीकारल्या जाईल. तर एका कुटुंबात केवळ दोनच खाते स्वीकारल्या जातील. एका वर्षात किमान रु. 250 किंवा जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी ते परिपक्व होते. व मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर 50 टक्क्यापर्यंतची जमा असलेली रक्कम खात्यातून काढता येते. या योजनेत व्याजदर आकर्षक असून वर्तमानामध्ये 7.6 टक्के व्याजदर आहे. या खात्याला भारतामध्ये कुठेही ट्रान्सफर करता येते. तसेच रक्कम बँकेतून, पोस्ट ऑफिस व पोस्ट ऑफिसमधून बँक मध्ये ट्रान्सफर करता येते.

योजनेच्या अधिक माहितीसाठी www.indiapost.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन पोस्ट विभागामार्फत करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment