Search This Blog

Tuesday, 24 January 2023

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम


जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम 

चंद्रपूर,दि. 2जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर आणि जिल्हा वकील संघ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त जिल्हा न्यायालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म तर प्रमुख वक्ते म्हणून गोंडपिपरी येथील  कला व वाणिज्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. मोहरकर यांनी मराठी भाषा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. मराठी भाषा कशी लोप पावत चालली आहे, तसेच मराठी भाषेचा इतिहास आणि समाजातील शिक्षणपद्धतीवर प्रकाश टाकला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (तृतीय) डॉ. अनिता नेवसे यांनी, मराठी भाषा ही न्यायालयीन कामकाजाची भाषा असून प्रत्येकाने मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे सांगितले. यावेळी त्यांनी विविध कवितांचा व चारोळ्यांचा आधार घेतला.

अध्यक्षीय भाषणामध्ये न्या. भीष्म यांनी वकील व न्यायाधीश यांचा केंद्रबिंदू असलेला पक्षकार याला सहज समजेल अशा मराठी भाषेमध्ये प्रकरणांचा मसुदा तयार केला गेला पाहिजे व न्याय देता आले पाहिजे, असे सांगितले. कायदे इंग्रजी भाषेमध्ये असले तरी न्याय निर्णयामध्ये  नमूद केलेले कारण पक्षकारांना समजावे यासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अभय पाचपोरउपाध्यक्ष राजेश ठाकूरजिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी तर आभार सह दिवाणी न्यायाधीश एन. एन. बेदरकर यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment