Search This Blog

Tuesday 31 January 2023

हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 100 टक्के यशस्वी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा



हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 100 टक्के यशस्वी करा - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø 10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मिळणार घरोघरी गोळ्या

            चंद्रपूर, दि. 31 : हत्तीरोग ही चंद्रपूर जिल्ह्यातील गंभीर समस्या आहे. या रोगामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. यासाठी शासनाकडून राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम 10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. या कालावधीत आपल्या घरी औषधी / गोळ्या घेऊन येणा-या कर्मचा-यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच आरोग्य यंत्रणेने ही मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम., आरोग्य सेवा (हिवताप) विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जागतिक आरोग्य संघटनेच्या नागपूर विभागाच्या सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, दीपेंद्र लोखंडे, डॉ. संदीप गेडाम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे आदी उपस्थित होते.   

            जिल्ह्यातील 9 तालुक्यात चंद्रपूर (ग्रामीण), भद्रावती, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मुल, सावली, सिंदेवाही व ब्रम्हपूरी या तालुक्यात सदर मोहीम राबविण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, तालुका स्तरावर तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, नगर परिषद / पंचायतीचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच एन.सी.सी, एन.एस.एस चे जिल्हा समन्वयक आणि शाळा महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत त्वरीत बैठक घ्यावी. शासनाने हत्तीरोग दूरीकरण मोहिमेंतर्गत तीन औषधांची (आयडीए) उंची व वयोगटानुसार एक मात्रा घेऊन या रोगाचा समुळ नाश करता येतो.

हत्तीरोगाच्या तीनही औषधी प्रत्येक घरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचा-याद्वारे मोफत देण्यात येणार आहे. ही औषधी उपाशी पोटी घेऊ नये. अलबेंडाझॉल ही गोळी चावून चावून खावी. औषधी देणा-या आरोग्य कर्मचा-यांच्या समोरच गोळ्या खाणे आवश्यक आहे. दोन वर्षांपेक्षा कमी वयाची बालके व गरोदर माता तसेच गंभीर आजारी रुग्णांना ही औषधी दिली जाणार नाही. सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच हत्तीरोग दुरीकरणासाठी या मोहिमेत लोकसहभाग वाढविणे आणि जनजागृती करण्यावर भर द्यावा. हत्तीरोगापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी आणि सर्व संबंधित यंत्रणेने ही मोहीम 100 टक्के यशस्वी करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

जिल्ह्यात सन 2022 मध्ये हत्तीपाय व हत्तीहाथाचे 10380 रुग्ण आढळले असून हायड्रोसिलचे 3067 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 672 जणांवर हायड्रोसिल ची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 

०००००००

No comments:

Post a Comment