Search This Blog

Wednesday, 4 January 2023

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी एल्डर लाईन-14567

 ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी एल्डर लाईन-14567

चंद्रपूर, दि. 4 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी, एल्डर लाईन 14567 ही टोल-फ्री (ज्येष्ठासांठीची राष्ट्रीय हेल्पलाइन) सर्व राज्यात सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाचे सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ज्येष्ठांसाठी ही राष्ट्रीय हेल्पलाइन जनसेवा फाउंडेशन,पुणे या संस्थेद्वारे चालविली जात आहे.  

या राष्ट्रीय हेल्पलाइनचा उद्देश भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे हा आहे. राष्ट्रीय हेल्पलाइन ही वयोवृद्ध व्यक्ती साठी असून या राष्ट्रीय हेल्पलाईनचा टोल-फ्री क्रमांक 14567 हा आहे. हेल्पलाइनची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असेल. हेल्पलाइन वर्षातील 362 दिवस सुरू असेल. तर सदर हेल्पलाइन ही चार दिवस पूर्णपणे बंद असेल. त्यामध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर  व  1 मे महाराष्ट्र दिन या राष्ट्रीय सुट्ट्यांचा समावेश असेल.

या आहेत एल्डर लाईन-14567 हेल्पलाइनमार्फत मिळणाऱ्या सेवा :

आरोग्य जागरूकता, निदान, उपचार, निवारा/ वृद्धाश्रम घरे, डे-केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठासंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक कला, करमणूक आदींची माहिती. कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण( मालमत्ता, शेजारी इत्यादी), आर्थिक, पेन्शन संबंधित, सरकारी योजना आदींचे मार्गदर्शन. चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी)चे भावनिक समर्थन तर बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर मदत आदी सेवा या हेल्पलाइनच्या माध्यमातून मिळेल. या हेल्पलाइनसाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहे, असे एल्डर लाईनचे प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शहा यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment