Search This Blog

Thursday 12 January 2023

मकरसंक्रांती सणाचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

मकरसंक्रांती सणाचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 12 संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे यासोबतच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मकरसंक्राती हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

            या दिनाचे औचित्य साधून प्रत्येक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारीत चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहारतज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मकर संक्रांती हा दिवस राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


००००

No comments:

Post a Comment