राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत महाडीबीटीद्वारे शेतकऱ्याला मिळाला तेलघाणीचा लाभ
चंद्रपूर, दि.25 : राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातंर्गत सन 2022-23 महाडीबीटीद्वारे जिल्ह्यातील वायगाव येथील शेतकरी वसंत कोचुजी मंथनवार यांना रु. 1 लक्ष 80 हजार अनुदानावर तेलघाणी देण्यात आली आहे. “पोशिंदा खादय तेल निर्मिती केंद्र” असे या तेलघाणीचे नाव आहे. या तेलघाणीमुळे सदर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली असून सद्यस्थितीत तेलघाणीमध्ये जवस, करडई, भुईमुग या बियाचे 50 ते 60 लीटर तेल काढून विकल्या जात आहे. वसंत कोचुजी मंथनवार या शेतकऱ्याने तेलघाणीचा लाभ घेतल्यामुळे आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा तेलबियाच्या पेरणीमध्ये वाढ केली आहे. चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा येथील गौतम हरिचंद्र सागोरे या शेतकऱ्याने स्वता:च्या शेतात करडई वाण आयएसएफ-764 ची लागवड केलेली आहे.
करडई पिकाची लागवड केल्यास वन्यप्राण्याचा त्रास कमी होईल तसेच नैसर्गिक पध्दतीने बनविलेले शुध्द व विना गाळप केलेले आरोग्यवर्धक तेल ग्राहकांना उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. सद्यपरिस्थितीत इतर देशातून तेल आयात करावे लागत आहे. अशा परिस्थीतीत स्थानिकरीत्या महाडीबीटी अंतर्गत तेलघाणीचा लाभ व करडई पिकाच्या क्षेत्रात वाढ झाल्यास शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे.
जिल्हयात तेलघाणीमुळे तेलबिया जसे करडई, जवस, मोहरी या अपारंपारीक पिकाच्या क्षेत्रात वाढ होत असून यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिक घेणे शक्य झाले आहे तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. शहरी भागातून तेलघाणीपासून काढलेल्या तेलाची वाढती मागणी लक्षात घेता जिल्हयात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तेलघाणीचा अनुदानावर लाभ देण्यासाठी कृषि विभागाने नियोजन केले आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना महाडिबीटीव्दारे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment