Search This Blog

Sunday 29 January 2023

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज - जिल्हाधिकारी विनय गौडा


 

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज - जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø 50 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन

            चंद्रपूर, दि. 29 : विज्ञान म्हणजे काय? विज्ञानाची मानवी जीवनात गरज काय? अशा प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधून विज्ञानाचा, आपल्या दैनंदिन जीवनात वापर करून विद्यार्थ्यांनी आपली व देशाची प्रगती केली पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षकांनी निर्माण करण्याची गरज आहे. एखादी नवीन वस्तु विद्यार्थ्यांनी बघितली असेल तेव्हा त्या वस्तुबद्दल त्याच्या मनात विविध प्रश्न तयार झाले पाहिजे. त्या वस्तुचा चिकित्सक अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे, असे विचार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी व्यक्त केले.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर तसेच जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने " तंत्रज्ञान व खेळणी" या मुख्य विषयावर सेंट मायकेल इंग्लिश स्कूल, चंद्रपूर येथे पार पडलेल्या ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन २७, २८ आणि २९ जानेवारी २०२३ या कालावधीत केले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी (माध्य.) दिपेंद लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, रुपेश कांबळे, लोकनाथ खंडारे, शिक्षण विस्तार अधिकारी सावन चालखुरे, लघुत्तम राठोड, गणेश येळणे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक जॉन्सन म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे निव्वळ शैक्षणिक विकास करणे नव्हे. तर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कौशल्याला वाव देवून त्याला प्रोत्साहित करण्याचे कार्य शिक्षकांनी व पालकांनी केले पाहिजे. विद्यार्थ्यांला केवळ जास्त गुणांची अपेक्षा न करता त्याच्या आवडीनुसार तो रमला पाहिजे. सर्व क्षेत्रामध्ये विकास होणे गरजेचे आहे. विद्यार्थी जर चांगला घडला तर देशाचा विकास होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष प्रतिकृतीचे पाहणी करून सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यातील निवड झालेल्या माध्यमिक व प्राथमिक गटातील प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. त्यात माध्यमिक गटात एकूण ४९ प्रतिकृतींची नोंदणी झाली असून त्यात गैर आदिवासी गटात ३७ तर आदिवासी गटात १२ प्रतिकृती आणि प्राथमिक गटातमध्ये एकूण ४८ प्रतिकृतींची नोंदणी झाली असून गैर आदिवासी गटात ३६ तर आदिवासी १२ प्रतिकृतींची नोंदणी झाली आहे. शैक्षणिक साहित्य शिक्षकांचे यामध्ये माध्यमिक शिक्षक १० तर प्राथमिक शिक्षक ११ आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांचे एकूण १० साहित्य नोंदणी केली आहे. प्रतिकृतींचे मुल्यमापनवहोणार असून प्रदर्शनी भेट सुद्धा राहणार आहे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले. संचालन अमित अडेट्टीवार यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण यांनी मानले.

०००००००

No comments:

Post a Comment