Search This Blog

Wednesday 25 January 2023

शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन


शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि.25 : सदयस्थितीत हरभऱ्याचे पीक हे काही ठिकाणी वाढीच्या तसेच बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. यादरम्यान घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असुन या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढूरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोडया मोठया झालेल्या अळया संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांदयाच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळया प्रामुख्याने फुले व घाटयांचे नुकसान करतात. मोठया झालेल्या अळया घाटयाला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः 30 ते 40 घाटयांचे नुकसान करते.

असे करा घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन :

 घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी आदी पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचे नैसर्गिक पक्षी थांबे म्हणुन उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हे. 20 पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्षांचे अळया वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्यांचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी 2 किंवा हेक्टरी 5 सापळे याप्रमाणे लावावेत. सापळयामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

शेतकरी बंधुनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर(1 ते 2 अळया प्रतिमिटर ओळ) आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या. पहीली फवारणी(50 टक्के फुलोऱ्यावर असतांना) निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि (1410 पिओबी/मिली) 500 एल.ई./हे. किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी.,20 मि.ली. तर दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीच्या 15 दिवसानंतर) इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के एस.जी ग्रॅम किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली  किंवा फ्ल्युबेडामाईड 20 टक्के डब्लुजी 5 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मिली. मिसळून फवारण्या कराव्यात व हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावेत असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment