12 वी विज्ञान शाखेच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्राचे वाटप
Ø विश्वशांती महाविद्यालय,सावली येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे आयोजन
चंद्रपूर,दि.24 : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता तसेच त्यानंतर नोकरीकरीता मागासप्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 11 व 12 वी विज्ञान शाखेत असतांनाच वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. याकरीता महाविद्यालय स्तरावर शिबीर घेणे, विद्यार्थी,पालक,मुख्याध्यापक व शिक्षक यांना मार्गदर्शन करणे आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता समाजकल्याण,आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांनी राज्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना सुचित केलेले आहे.
त्यानुसार विश्वशांती महाविद्यालय, सावली येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांना समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
विश्वशांती महाविद्यालय, सावली येथे विज्ञान शाखेच्या 11 वी मध्ये 77 तर 12 वी मध्ये 86 विद्यार्थी प्रवेशित आहेत. यामध्ये इयता 12 वी विज्ञान शाखेच्या संपुर्ण 100 टक्के विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले असून 11 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता प्रस्ताव महाविद्यालयामार्फत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राकरीता अडचणी उद्भवू नये, याकरीता जिल्हाभर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 12 वी विज्ञान शाखेत एकूण 8,126 विद्यार्थी प्रवेशीत असून त्यातील 1,210 विद्यार्थी हे बाहेर राज्यातील व बाहेर जिल्ह्यातील आहेत. यामधील 99 टक्के विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जातवैधता प्रमाणपत्र निर्गमीत केले आहे. तसेच 11वी विज्ञान शाखेचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्वीकारणे सुरु करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत समितीकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले.
या मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करतांना येणाऱ्या अडचणी, फार्म कसा सादर करावा, सादर करण्यात येणारे आवश्यक दस्तऐवज आदीबाबत उपायुक्त विजय वाकुलकर यांनी मार्गदर्शन केले. विश्वशांती महाविद्यालय,सावली येथील 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना 100 टक्के वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व 11 वी विज्ञान शाखेच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना चालू सत्रामध्ये वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्गदर्शन शिबिरामध्ये मुख्याध्यापक रविंद्र मुप्पावर, राहुल आदे, धनंजय गुर्नुले, राजश्री बिडवाई, पर्यवेक्षक राऊत सर, सौरभ सुर्यवंशी यांचेसह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment