प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण
चंद्रपूर, दि. 1 : ‘सर्वासाठी घरे – 2024’ हे केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. याच ध्येयपूर्तीसाठी व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी राज्यात महा आवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात अमृत महाआवास अभियान सुरू आहे.
शासनाच्या धोरणाअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यासर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीकरीता 43484 चे उद्दिष्ट प्राप्त आहे. विशेष म्हणजे या सर्व घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून यापैकी 27659 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत 15 हजार 780 घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. यापैकी ज्या लाभार्थीकडे स्वत:ची जागा नाही, अशा लाभार्थीकरीता पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 50 हजारपर्यंतचे अनुदान देय आहे. तसेच अतिक्रमण नियमानुकुल योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमानुकुल करणे, भूमिहीन लाभार्थींना घरकुल बांधकामाकरीता शासकीय जागा विनामुल्य देणे आदी योजनेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून संपूर्ण घरकुले 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने, निधीचे वितरण पंचायत समिती स्तरावरून करण्यात येत असून ही सर्व घरकुले विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या.
राज्य पुरस्कृत आवास योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत 4209, शबरी आवास योजना 1363, आदिम आवास योजना 206 असे एकूण 5778 घरकुलांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. सदर घरकुले सुध्दा 31 मार्च, 2023 पर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्या आहेत.
रमाई आवास योजना सन 2022-23 करीता 4 हजार, शबरी आवास योजना सन 2022-23 करीता 1 हजार 68 उद्दिष्ट चंद्रपूर जिल्हयास प्राप्त झाले आहे. तसेच मागील वर्षातील शिल्लक उद्दिष्ट रमाई आवास योजना- 2006, शबरी आवास योजना 5 व आदिम आवास योजना 214 असे उद्दिष्ट शिल्लक आहे. सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थीनी ग्रामपंचायतीमार्फत संबंधित गट विकास अधिकारी यांचेकडे घरकुलाकरीता अर्ज करावा. तसेच ज्या लाभार्थ्यांनी शासनाच्या अनुदानाची उचल केलेली आहे व घरकुलांचे बांधकाम अद्यापपर्यंत सुरू केलेले नाही, अश्या लाभार्थीकडून अनुदानाची रक्कम वसूल करण्याबाबत सूचना देण्यसात आल्या आहेत. अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याकरीता तसेच रखडलेली घरकुले सुरु करण्यासाठी ग्रामस्तरावर लाभार्थी मेळांव्यांचे आयोजन करण्यात येत आहे, असे जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment