चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्य गीताचा शुभारंभ
Ø सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चा जागर
Ø छत्रपतींच्या राज्यभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे करणार
चंद्रपूर, दि. 19 : सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला व त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या राज्यगीताचा शुभारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झाला, असे घोषित करून श्री. मुनगंटीवार म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाच्या 1 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. शिवजयंती हा केवळ एक उत्सव नव्हे तर छत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या पर्वावर रयतेचे राज्य आणण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस आहे. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम जागवतो, गीतामधून विरतेचा मंत्र दिसतो. जगातील सर्वात जास्त वाघ असलेल्या भुमीतून या राज्यगीताचा शुभारंभ होत आहे, याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे.
‘जय भवानी...जय शिवाजी’ हे केवळ शब्द नाही तर उर्जा, उत्साह देणारे शब्द आहेत. शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी रक्तामध्ये चैतन्य निर्माण होते, वीरता जाणवते. शिवाजी महाराज या नावामध्ये एक वेगळीच शक्ती आहे. शिवाजी महाराज हे सर्वधर्माचा सन्मान करणारे राजे होते. त्यांचे आचरण 24 कॅरेट सोन्यापेक्षाही शुद्ध होते. शिवाजी महाराजांचा पर्यायी शब्द म्हणजे ‘परीस’ होय.
पुढे ते म्हणाले, औरंगजेबाची क्रुरता सर्वांना माहित आहे. या क्रुरतेविरुध्द भयमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांची भगवा झेंडा हाती घेतला. चोर वाघनखाने अफझजलखानाचे पोट फाडून कोथळा बाहेर काढण्याचे काम महाराजांनी केले. मात्र 29 जुलै 1953 पासून अफझलखानाचे उदात्तीकरण सुरू झाले. उदात्तीकरण क्रुरतेचे होऊ शकत नाही. विरतेचे होईल. म्हणूनच 5 नोव्हेंबर 2022 ला राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आपण बैठक घेतली. अफझलखानच्या कबरीजवळ असलेले 0.22 हेक्टरचे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आणि 10 नोव्हेंबर 2022 रोजी अतिक्रमण हटविले. 10 नोव्हेंबर हा दिवस निवडण्याचे प्रमुख कारण होते की, याच दिवशी छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.
विशेष म्हणजे कबरीजवळील अतिक्रमण हटविण्याच्या सांस्कृतिक विभागाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला. ‘चांदा पासून बांदा’ पर्यंत आणि ‘भामरागड पासून रायगडपर्यंत’ छत्रपतींच्या राज्यभिषेकाचे 350 वे वर्ष संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरे करण्याचा आपला संकल्प आहे. एवढेच नाही तर आपल्यासाठी प्राणप्रिय व कोहीनुर हि-यापेक्षाही जास्त महत्वाची असलेली शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडवरून भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान, भारत सरकारचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचे आचरण भावी पिढीला माहित होण्यासाठी पुढील वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या नाटकाचे प्रयोग नि:शुल्क सुरू करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेला चित्रपट महोत्सव जिल्ह्याजिल्ह्यात करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालय आपण तयार करीत आहोत. शिवसाहित्य संमेलन, शिवगीत स्पर्धा घेण्याचा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, शिवजयंतीनिमित्त आग्र्याला आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे 100 एकर जागेत छत्रपतींचे स्मारक करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे सहकार्य घेण्यात येईल. 2 जून 2023 पासून एक कोटी तरुण – तरुणी शिवभक्तांची पोर्टलवर नोंदणी करण्याचा आपला संकल्प आहे. सुर्य – चंद्र असेपर्यंत शिवाजी महाराजांचे नाव राहणार आहे. त्यामुळे जात, पात, धर्म, पंथ याच्या पलिकडे जाऊन प्रत्येकाच्या हृदयात फक्त ‘शिवबा’ च असू द्या, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते लखोटा उघडून राज्यगीताचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी शिवस्मारकाला अभिवादन करून श्री. मुनगंटीवार यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून भगवे फुगे आकाशात सोडण्यात आले. जगदंबा ढोल – ताशांच्या निनादात ‘जय भवानी...जय शिवाजी’ चा जागर करण्यात आला. विक्की दुपारे व विजय पारखी यांनी राज्यगीत सादर केले.
प्रास्ताविकात डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, राज्यगीताची सहा दशकाची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आज पूर्णत्वास आली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याबाबत 30 जानेवारी 2023 रोजी मंत्रीमंडळाचा निर्णय झाला आणि शिवजयंतीच्या पर्वावर राज्यगीताचे गायन सर्व शासकीय कार्यक्रमात आता होणार आहे. 12 मे 1666 रोजी औरंगजेबाने शिवाजी महाराजांनी आग्र्याला बंदिस्त केले होते. तब्बल तीन महिन्यानंतर 17 ऑगस्ट 1666 रोजी शिवाजी महाराजांची गनिमी कावा करून स्वत:ची सुटका करून घेतली. त्याच आग्र्याच्या दिवान–ए-आम मध्ये पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिवाजी महाराज जयंती साजरी होत असल्याचे श्री. गुलवाडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन रवी गुरनुले यांनी केले. याप्रसंगी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, संजय कंचर्लावार, राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे, रवी आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, विशाल निंबाळकर, रामपाल सिंह, संदीप आवारी, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment