Search This Blog

Friday 10 February 2023

जिल्हास्तरीय हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे उद्घाटन

 




जिल्हास्तरीय हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 10 : सार्वजनिक आरोग्य विभाग व  जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 या दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जि. प. आदर्श शाळा, चिंचाळा येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉराजकुमार गहलोत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयस्वाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडल, नागाळाच्या सरपंच शोभ चिमूरकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटकीय भाषणामध्ये प्रत्येक नागरिकांना या मोहिमेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या गोळ्या प्रत्यक्ष खाऊ घालण्याचे काम आरोग्य यंत्रणेने करावे. तसेच फक्त आकडेवारीवर न जाता 100 टक्के लोकांना समक्ष गोळ्या खाऊ घालाव्यात व ही मोहीम यशवी करावी, अशा सुचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.

अध्यक्षीय भाषणात विवेक जॉन्सन म्हणाले, या मोहिमेंतर्गत 1 लक्ष 6 हजार 538 लोकसंखेला गोळ्या खाऊ घालण्यासाठी  4329 चमू बनविन्यात आल्या आहेत. पात्र नागरिकांनी हत्तीरोगाचे दूरीकरण करण्याकरीता प्रत्यक्ष गोळ्या खाणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी आरोग्य कर्मचा-यांसमक्ष गोळ्या खाल्याची खात्री करावी, तेव्हाच ही मोहीम यशस्वी होईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक भाषणा डॉ गहलोत यांनी 9 तालुक्यातील 942 गावात हत्तीरोग औषधोपचार मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालून उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन योगिता येरणे व पूजा चौधरी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नामदेव अस्वले यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश शेंडे, श्री. सातपुते, श्रीमती जुनघरे, डॉ. झाडे, केंद्रप्रमुख श्रीमती फुलझेले उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment