पुणे येथील वारिला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत समाजकल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
Ø विद्यार्थ्यांनी 8 स्वर्ण, 12 रजत तर 17 कास्य पदके केली प्राप्त
चंद्रपूर, दि. 08 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील कार्यरत वसतिगृह, निवासी शाळा येथील मुला-मुलींना मागील 3 महिन्यापासून ज्युडो कराटे प्रशिक्षण देण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांच्या मार्गदर्शनात पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनीं सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 8 स्वर्णपदक, 12 रजत पदक तर 17 कास्य पदक प्राप्त करून जिल्ह्यातील समाजकल्याण विभागामार्फत कार्यरत वसतिगृह व निवासी शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले आहे.
आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा मान जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाचे शासकीय वसतिगृह, निवासी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिळविला. या स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून 40 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विसापूर येथील निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका बबिता हुमणे, वसतिगृहाच्या गृहपाल अनिता वानखेडे, वरोरा येथील वसतिगृहाचे गृहपाल श्री. बागडे, ब्रम्हपुरी येथील वसतिगृहाचे गृहपाल अजय बोरकर या सर्वांनी सदर स्पर्धेकरीता प्रोत्साहित केले. सदर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा येथे दि. 26 व 27 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 6 देशांनी सहभाग दर्शविला होता. यामध्ये प्रामुख्याने भाग घेणारे देश श्रीलंका, नेपाळ, भूतान, तिबेट, ब्रह्मदेश (म्यानमार), बांगलादेश व भारत या देशातील 2 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली वारिला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर व विदर्भ अम्युचर कराटे असोसिएशनचे डॉ. सोमेश्वर येलचलवार यांचे मुख्य मार्गदर्शन तसेच महिला प्रशिक्षिका ज्योती माणूसमारे, कविता घोरमोडे, राहुल गौरकार, सुशांत चाटोरे, कुंदन पेंदोर या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे प्रशिक्षण दिले.
००००००
No comments:
Post a Comment