करडई पिकाच्या गट प्रात्यक्षिकाची पाहणी
चंद्रपूर, दि. 3 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा (गळीत धान्ये) अभियान अंतर्गत मौ. खेडी (ता. सावली) येथील करडई पिकाच्या गट प्रात्यक्षिकास कृषी विभागाच्या अधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी कृषी उपसंचालक तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, सावलीच्या तालुका कृषी अधिकारी अश्विनी गोडसे, मंडळ कृषी अधिकारी अण्णासाहेब वाघमारे, कृषी सहायक श्री. साखरे, आणि दशरथ तावाडे, करडई उत्पादक शेतकरी मारोती हनमंतू नरेडीवार (करडई क्षेत्र पेरणी 4 एकर), राजीव मार्खंडी कटकमवार (करडई क्षेत्र पेरणी 1.5 एकर) उपस्थित होते.
सावली तालुक्यातील एकूण 54 हेक्टर क्षेत्रावर करडई पिकाची पेरणी झालेली असून खेडी, निपंदरा, चेकपिरंजी या भागात करडई क्षेत्रात वाढ होत आहे. भारतीय तेलबिया संशोधन केंद्र, हैदराबाद येथून मिळालेल्या करडई वाणाची डिसेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात पेरणी झाल्यानंतर पीक परिस्थिती रोगमुक्त आणि समाधानकारक वाढीच्या अवस्थेत दिसून आली. सावली भागात वन्य प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होते. मात्र वन्य प्राण्यांमुळे करडई पिकास कोणतेही नुकसान होत नसल्याने आणि कमी पाण्यात आणि कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारे पीक असल्याने शेतक-यांनी यास पसंती दर्शविली आहे.
तसेच उत्पादित होणा-या करडई पासून तेल निर्मिती करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत सहभागी होण्याची तयारी श्री. नरेडीवार यांनी दर्शविली. तसेच मिनी ऑईल मिल एक्स्पेलर युनिट सुरू करून या भागातील करडई पिकावर प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्याचीही त्यांची तयारी असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment