Search This Blog

Tuesday, 28 February 2023

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोप





 जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोप

चंद्रपूर, दि. 28: कृषी विभागाच्या वतीने 24 फेब्रुवारी रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे कृषी महोत्सव व पशुप्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. सलग पाच दिवस चाललेल्या कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचा समारोपीय कार्यक्रम पार पडला

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, माजी कृषी सहसंचालक डॉ. उदय पाटील, मूलचे तालुका कृषी अधिकारी  भास्कर गायकवाड, नामदेव डाहुले, संजय गजपुरे, नरेंद्र जीवतोडे तसेच वयाची शंभरी पार केलेले वयोवृद्ध आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, चांदा क्लब ग्राउंड येथे पाच दिवस जिल्ह्याचे कृषीप्रदर्शन झाले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जिल्ह्यामध्ये मिशन जयकिसान ची  घोषणा केली. शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पुढच्या वर्षभरात काय काय उपायोजना करावयाच्या आहे? त्याचे संपूर्ण विवेचन आणि नियोजनबद्ध कार्यक्रम मिशन जय किसानच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे तर शेतकरी या देशाचा कणा आहे. या अमृत महोत्सवीवर्षात बळीराजाला बळकट करण्याचे काम देशपातळीवर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. शेतकरी  एका दान्याचे हजार दाणे करतो व काळ्या मातीतून सोने उगवतो. या देशाची लोकसंख्या 130 करोड आहे. त्यांना अन्नधान्य पुरविण्याचे काम हा शेतकरी करतो. पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाचे व प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचे कथन ऐकण्यास मिळाले. शेतकरी जसा प्रयोगशील असतो त्याचप्रमाणे अधिकारी सुद्धा प्रयोगशील असावा तरच कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ शकेल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या संकल्पनेतून मिशन जय किसान जिल्ह्यात सुरू केले. शेतकरी हा देशाची ताकद असून आज 130 कोटी लोकसंख्या असलेल्या जगाला अन्न पुरविण्याचे काम शेतकरी करीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. विदर्भात सर्वात जास्त ज्वारीचे क्षेत्र हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तर आरोग्याच्या दृष्टीने फळाचे महत्व, फायदे व त्याबाबतची जनजागृतीसाठी कृषी विभागामार्फत स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकेत प्रकल्प उपसंचालक नंदकुमार घोडमारे म्हणाले, 24 फेब्रुवारी रोजी कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनीचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या ठिकाणी 200 स्टॉलची उभारणी करण्यात आली. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून मिलेट दौड काढण्यात आली तर पाच दिवसीय प्रदर्शनीमध्ये विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले. या पाच दिवसीय महोत्सवात 18 हजार 267 लोकांनी नोंदणी करून प्रदर्शनीला भेट देत लाभ घेतला. प्रत्येक स्टॉलवर संवाद साधला असता 26 लाख 61 हजार 600 रुपयांचे साहित्य विक्री झाली असल्याची माहिती मिळाली असल्याचे सागिंतले.

तत्पूर्वी, वयाची शंभरी पार केलेल्या भीमा राठोड (110 वर्ष), परसराम राठोड(105 वर्ष), जनाबाई चव्हाण(103 वर्ष) व भोजू गायकवाड(102 वर्ष) यांचे मान्यवरांच्या हस्ते चरण धुवून सत्कार करण्यात आला. या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शंभर पार केलेल्या वयोवृद्धांनी स्वतःचे अनुभव कथन केले.

यावेळी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (फलोत्पादन)चंद्रशेखर आवारी, मोरेश्वर देरकर, स्वप्निल कोल्हटकर, किशोर ठावरी, गजानन बन्सोड आदी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

00000

No comments:

Post a Comment