Search This Blog

Monday 27 February 2023

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली केंद्र बांधकाम निधी त्वरित मंजुरीसाठी पालकमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली केंद्र बांधकाम निधी

त्वरित मंजुरीसाठी पालकमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे

चंद्रपूरदि. 27 : गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असून सदर विद्यापीठाच्या गडचिरोली केंद्राच्या स्वतः च्या इमारतींचे बांधकाम वेगाने होणे आवश्यक आहे. त्याकरीता बांधकाम निधीचे अंदाजपत्रक त्वरित मंजुर व्हावे यासाठी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुलपती व राज्यपाल रमेश बैंस यांना एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

गोंडवाना विद्यापीठ हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकरीता स्थापन करण्यात आले आहे. या दोन्ही जिल्ह्यात आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. या दोन जिल्ह्यात वनक्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार क्षमता वाढविणारे शिक्षणक्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करणे हे उद्दिष्ट गोंडवाना विद्यापीठाने समोर ठेवले आहे.

सध्या गडचिरोली येथील विद्यापीठ केंद्र भाड्याच्या इमारतीत आहे. या विद्यापीठावर दोन्ही जिल्ह्यातील तरूणांचे भवितव्य अवलंबून असल्याने विद्यापीठ स्वतःच्या इमारतीत  लवकरात लवकर स्थलांतरित होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली केंद्राच्या बांधकामासाठी 884 कोटींचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. या अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यानंतर निधीविषयक प्रक्रिया पुढे सरकेल. त्यामुळे हे अंदाजपत्रक मंजूर करण्याकरीता राज्यपाल महोदयांनी कुलपती या नात्याने त्वरित लक्ष घालावेअशी विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल श्री रमेश बैंस यांना केली आहे. या विषयात राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

००००००

No comments:

Post a Comment