Search This Blog

Saturday, 4 August 2018

25 दिवसात चंद्रपूर जिल्हयात 60 लाख वृक्षलागवड पालकमंत्र्यांच्या आवाहानाप्रमाणे उद्दिष्टपूर्तीकडे घोडदौड

चंद्रपूर, दि.25 जुलै  राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या ‘ एकच लक्ष 13 कोटी वृक्ष’  या मोहीमेला त्यांच्या गृह जिल्हयात मोठया प्रमाणात यश मिळत असून 25 जुलैपर्यंत जिल्हयामध्ये 60 लाख वृक्ष लागवड झाली आहे. जिल्हयामध्ये सर्व विभागानी मिळून 75 लाख वृक्ष लागवडीचा सामुहिक संकल्प केला असून याकडे जिल्हयाची वाटचाल सुरु आहे.
               संपूर्ण महाराष्ट्रात वृक्ष लागवडीला वाढता प्रतिसाद मिळत असून वनमंत्री म्हणून सतत तिस-या वर्षी देखील ना.मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीच्या मोहिमेकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन 31 जुलैच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी त्यांना आंमत्रित केले आहे. 25 जुलैपर्यंत राज्यामध्ये 11 कोटी 88 लाख वृक्षलागवड झाली आहे. 13 कोटीचा संकल्प दृष्टीपथात असून पालकमंत्री उद्या चंद्रपूरच्या दौ-यावर येणार आहेत. यावेळी देखील ते सर्व विभागांचा आढावा घेणार आहेत.  चंद्रपूरच्या वनविभागाने उद्दिष्टपूर्ती करत 3 लाख वृक्षलागवड अधिक केली आहे. त्यांना 27 लाख 50 हजाराचे उद्दिष्ट होते. वनविभागाची वाटचाल 30 लाख 93 हजार वृक्षलागवडीपलीकडे गेली आहे.
               सद्या सर्वात जास्त वृक्षलागवड नांदेड जिल्हयात झाली आहे. नाशिक दुस-या क्रमांकवर, यवतमाळ तिस-या क्रमांकावर तर पालकमंत्री यांचा गृह जिल्हा असणारा चंद्रपूर व शेजारच्या गडचिरोली जिल्हा चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे.
               पहिल्या 25 दिवसात वनविभागाकडे आलेल्या आकडेवारी नुसार (कंसात दिलेली आकडेवारी या वर्षीचे उद्दिष्ट आहे) वनविभागाने 25 जुलैपर्यंत 30 लाख 93 हजार  वृक्षलागवड केली आहे. (27 लाख 50 हजार) त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाने 11 लाख 97 हजार 846 वृक्षलागवड केली आहे.(25 लाख 55 हजार) चंद्रपूर जिल्हयातील अन्य विभागांमध्ये ग्राम पंचायतीमार्फत 9 लाख 6 हजार वृक्षलागवड केली आहे.(9 लाख 2 हजार 257), सामाजिक वनीकरण विभागामार्फत 3 लाख 13 हजार 279 वृक्ष लावले आहे.(4 लाख) शैक्षणिक संस्थांनी 1 लाख 19 हजार, कृषी विभागाने 1 लाख 49 हजार वृक्षलागवड केली आहे.
               जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वृक्षलागवडीला गती मिळण्याचे संकेत असून वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरु केले आहे. याबाबतचा रोजचा आढावा घेतला जात असून आगामी काळात सामान्य नागरिकांनी देखील या मोहीमेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                                            0000 

No comments:

Post a Comment