Search This Blog

Saturday 4 August 2018

महाराष्ट्राच्या वृक्षलागवडीची जगाने घेतली नोंद- ना.मुनगंटीवार



विचोडा येथे विविध सामाजिक संस्थामार्फत वृक्षरोपण कार्यक्रम

      चंद्रपूर, दि.27 जुलै- वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, वृक्षलागवडीच्या संदर्भातील सर्वबाबींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्रात वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरु आहे. सुरुवातीला वृक्षलावगडीच्या या मोहिमेला सहजतेने घेणारे अनेक जण आता गंभीरतेने या मोहिमेचे पाईक झाले असून राष्ट्रपतीभवना पासून अमेरीकेच्या  दूतावासापर्यंत पर्यावरण पुरक मोहिमेची नोंद घेतली जात आहे. महाराष्ट्रातील वृक्षलागवड आता जागतिक झाली असून त्याची नोंद सर्वत्र घेतली जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा  पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
            चंद्रपूरच्या समाज जिवनावर सामाजिक कर्तृत्वाचा ठसा उमटवणा-या विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विचोडा येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी आयोजित केलेल्या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात ना.मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा स्थाई समिती सभापती राहूल पावडे, संकल्प गार्डन क्लब चंद्रपूरचे डॉ.अशोक वासलवार, जेष्ठ पत्रकार कल्पना पल्लीकुंडवार, सिमा मामीडवार, शाहीन शफीक आदींसह, सिडीसी बँक, रोटरी क्लब, आयएमए, चंद्रपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो., एमएसएमआर, ग्राम पंचायत विचोडा, ग्राम पंचायत छोटी पडोली आदी संघटना व संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            चंद्रपूरातील पर्यावरणवाद्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती. 13 कोटी वृक्षलागवडीच्या या कार्यक्रमामध्ये राज्य शासन राबवित असलेल्या उच्च तंत्रज्ञानाच्या वृक्षलागवड व वृक्षसंगोपनाच्या तंत्राला यावेळी वनमंत्र्यांनी विषद केले. ते म्हणाले, वनविभागाच्या नागपूर येथील कार्यालयात कमांड रुम निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये दर सेंकदाला होत असलेल्या वृक्षलागवडीची नोंद घेतली जाते. एक मोठा डिस्प्ले बोर्ड या ठिकाणी उभारण्यात आला आहे. त्यावर ही आकडेवारी सर्वसामान्यांना माहिती पडते. यावर्षी लावण्यात येणा-या प्रत्येक रोपाचे स्थळ नोंदण्यात येत असून सहा महिन्यानंतर या रोपटयांची स्थिती देखील माहिती पडणार आहे. यावर्षी लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाचे ऑडीट केले जाणार असून पर्यावरण प्रेमी ड्रोन कॅमे-याच्या माध्यमातून वृक्षलागवडीवर व वृक्षसंगोपनावर लक्ष ठेवून आहेत.
            वनविभागाने आपल्या नेतृत्वात ग्रिन आर्मीची (हरितसेना) निर्मिती केली आहे. ही हरितसेना एक कोटीची करण्याची आपली महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे पर्यावरण व वृक्षलागवड ही काही वर्षाचीच मोहिम न राहता, कायम व निरंतर चालणारी प्रक्रिया ठरेल, अशी आशा आहे.
            वृक्षलागवडीमध्ये ड्रोनसारख्या कॅमेराचा सक्रिय वापर, लागवडीसंदर्भातील होणारे मॅपींग, लागवडीचे ऑडीट या सर्व बाबींमुळे लावलेली झाडे, जगलेली झाडे या सर्व बाबी अतिशय पारदर्शी होत असून याची दखल अमेरीकेसारख्या प्रगत राष्ट्राने घेतली आहे.  अमेरीकेच्या दूतावासातील राजदुतांनी या घडामोडीची दखल घेत. ही मोहिम कशी राबविली जात आहे, याची माहिती घेतली. सिंगापूरच्या राजदुताने बांबू लागवडीच्या माध्यमातून हीरवाई आणण्याबाबत जाणून घेतले असून हा प्रयोग त्यांच्या देशात करण्याबाबत ते उत्सुक आहेत. वृक्षलागवडीकडे सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगाचे लक्ष लागले आहे.
            वृक्षलागवडीचा समारोप औरंगाबादला होत असून त्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेचे कौतुक केले आहे. त्यांनी हैद्राबाद येथील राष्ट्रपती भवनात चंद्रपूर वनविभागाने बांबूंच्या प्रजातींची लागवड करावी व तो भाग हिरवा करावा, असे निमंत्रण दिले आहे. आता राष्ट्रपती भवनात देखील चंद्रपूरचा बांबू पोहचणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महानायक अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयात चंद्रपूरचा झेंडा पोहचला आहे.
            चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग करणारा पहिला जिल्हा असला पाहिजे. त्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून जिल्हयामध्ये विविध प्रयोग व उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येकजण आपआपल्या क्षेत्रात सद्या व्यस्त असला तरी काही सामाजिक उपक्रमामध्ये वेळ देणे गरजेचे असते. आपल्या सारख्या समाज धुरीणांनी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत दिलेला सक्रीय सहभाग उल्लेखनिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संबोधित केले. वनमंत्री म्हणून महाराष्ट्र सुधीर मुनगंटीवार यांना कायम वृक्षलागवडीसाठी आठवणीत ठेवेल, असे ते म्हणाले. यावेळी गार्डन क्लबच्या सिमा मामीडवार व डॉ.वासलवार यांनी देखील कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाला सरपंच किरण डोंगरे, उमेश वासलवार, मनोज दुधानी, मनोज कांबडे, विजय मासिरकर, दत्तपंत मामीडवार, रमेश मामीडवार, सचिन गांगरेड्डीवार, गोपाल ऐकरे, प्रमोद राऊत, डॉ.चिनी, डॉ.मंगेश गुलवाडे, महेश वासलवार, राकेश कोलावार उपस्थित होते.
                                                                   000

No comments:

Post a Comment