जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत एकमुखी मागणी
‘हॅलो चांदा’ 155-398 या क्रमांकाचा तक्रारीसाठी वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि.28 ऑगस्ट - धान, कपाशी व अन्य पिकांवर आलेल्या किडीमुळे शेतकरी एकीकडे संकटात असतांना कृषी विभागाने त्यांना फवारणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. तसेच कृषी केंद्र मालकांनी फवारणी औषधीची उपलब्धता, योग्य औषधी वापरण्याचा सल्ला व त्याच्या किंमतीचे फलक दर्शनी भागात लावावे. या कृषी केंद्राची तपासणी नियमित व्हावी, त्याबाबत प्रत्येक तालुकास्तरीय अधिका-यांनी अंमलबजावणीसाठी पुढे यावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हयामध्ये यावर्षी पाऊस भरपूर असतांना पिकांवर आलेल्या किडीमुळे शेतकरी चिंतेत आहे. अशावेळी फवारणीचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. शेतक-यांनी कोणती औषधी फवारणीसाठी वापरावी. त्याचे प्रमाण किती असावे, या संदर्भात प्रत्येक कृषी केंद्रावर फलक लावावे, अशी मागणी समितीचे सदस्य गिरीधरसिंह बैस यांनी केली आहे. सोबतच बंदी आणलेल्या औषधीबाबतही जागृती करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अन्य सदस्य सदाशिव सुकारे यांनी औषधी व त्याच्या किंमतीची यादी लावण्याबाबत मागणी केली. आजच्या बैठकीमध्ये विद्युत मंडळाच्यामार्फत येणा-या अवास्तव विद्युत बिलाबाबतही सदस्यांनी तक्रारी नोंदविल्या. काही सदस्यांनी या संदर्भातील लेखी तक्रारी नागरिकांच्या वतीने आणल्या होत्या. विद्युत मंडळाने या संदर्भात लक्ष घालण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील फळे विक्रेत्यामार्फत फळे पिकवतांना होत असलेल्या रासायनिकाच्या वापराबाबत विभागाने सतर्क रहावे व नियमितपणे बैठकीत महिन्याच्या कार्यवाहीचा अहवाल दयावा, असा दंडक घातला.
याशिवाय शासकीय कार्यालयात मुद्रांक शुल्कासाठी अतिरीक्त पैशाची मागणी होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी समितीच्या सदस्यांनी केली. प्लॉस्टीकच्या बंदीबाबत चंद्रपूर महानगरपालिकेने राबविलेल्या मोहिमेचा आढावाही घेण्यात आला. जिल्हयाभरातील नगर पंचायतीनी देखील हा कित्ता गिरवावा, असे आवाहनही करण्यात आले. या बैठकीचे आयोजन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव आर.आर.मिस्कीन यांनी केले. या बैठकीला मार्गदर्शन करतांना निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी समिती सदस्यांच्या तक्रारीबाबत अतिशय गंभीरतेने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. या समितीने जनतेला त्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवार यंत्रणेच्या 155-398 या टोल फ्रि क्रमांचा वापर करण्याचे आवाहन केले. या टोल फ्रि क्रमांकावर तक्रार केल्यानंतर प्रशासनामार्फत महिनाभराच्या आत कार्यवाही करण्यात येते,असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला अ.मा.नरवाडे, वा.स.नामपल्लीवार, डॉ.विनोद गोरंटीवार, दत्तात्रेय गुंडावार, आशीष कोट्टावार, सचिन चिंतावार, मनिष व्यवहारे, कविश्वर साळवे, जगदीश रायठ्ठा, डब्ल्यु.जी.कुरेशी, नितीन गुंडेज्या, गिरीधरसिंह बैस, हर्षवर्धन पिपरे, कल्पना बगुलकर, मिनाक्षी गुजरकर, संगीता लोंखडे, सदाशिव सुकारे, सुहास कोतपल्लीवार, डॉ.प्रीती बैतुले, डॉ.अजय गोगुलवार आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment