Search This Blog

Wednesday 15 August 2018

चंद्रपूरातील वनविभागाच्या नवीन विश्रामगृहामुळे ताडोबाच्या पर्यटनाला अधिक उंची मिळेल : ना.सुधीर मुनगंटीवार




चंद्रपूरच्या लौकिकात भर घालणा-या वनविश्रामगृहाचे थाटात लोकार्पण

      चंद्रपूर, दि.15 ऑगस्ट  चंद्रपूर जिल्हा म्हणजे ग्रीनगोल्ड, ब्लॅकगोल्ड आणि हमखास व्याघ्र दर्शन घडविणा-या ताडोबा अभयारणांचा जिल्हा म्हणून जगभर विख्यात झाला आहे. आमच्या ताडोबाची श्रीमंती जगात पोहचली आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याच तुलनेच्या विश्रामगृहाची आवश्यकता होती. वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कमरता दूर केली असून ताडोबाच्या पर्यटनाच्या उंचीला नवा आयाम देणारे हे विश्रामगृह लोकार्पित करतांना मला आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
          रामबाग नर्सरीमध्ये विभागीय वनविभामार्फत वनविश्रामगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. या विश्रामगृहात सर्व पध्दतीच्या आधुनिक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. ताडोबा बघायला येणारे संशोधक, विदेशी पाहुणे, अभ्यासक व ताडोबामध्ये रुची ठेवणा-या  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मान्यवरांना अपेक्षित असे हे विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. 9 अद्ययावत कक्ष, बैठक कक्ष, परिषद कक्ष, प्रतिक्षालय असे दोन मजल्यांचे हे देखणे विश्रामगृह चंद्रपूर वनविभागाने आज लोकार्पित केले. या लोकार्पणासाठी एका शानदार सोहळयाचे आयोजन वनविभागाने केले होते.
          या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक ऋषीकेश रंजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता मनोज जैस्वाल, विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे आदी उपस्थित होते.
          यावेळी बोलतांना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून विविध सुधारणा आपल्या कार्यकाळात करु शकल्याचे समाधान व्यक्त केले. या भागाची सेवा अधिक क्षमतेने करण्यासाठी वनखाते आपण मागितले होते.  गेल्या काही वर्षात वृक्ष लागवडीच्या मोहिमेसह विविध योजनांच्या माध्यमातून वनावर अंवलबून असलेल्या जनेतेसाठी काम करु शकल्याचे त्यांनी सांगितले. ताडोबा जागतिक पर्यटन केंद्र होत असतांना या भागात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा राबता मोठया प्रमाणात वाढला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, देशातील उद्योगसमूह, विविध क्षेत्रातील सेलीब्रीटी वनविभागाच्या विविध योजनात सहभागी होत आहेत. वनविभागातील उपक्रमांसाठी येणा-या पाहुण्यांना विशेष दर्जा वनविभागाने दिला आहे. त्यांना या भागात यायचे असल्यास दर्जेदार निवास व्यवस्थेची आवश्यकता होती. या निवास व्यवस्थेच्या माध्यमातून ताडोबाच्या पर्यटनाला या ठिकाणच्या योजनांना आणि नव्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
            वनविभागाने या वर्षीच्या वृक्षलागवडीला ज्या तन्‍मयतेने पूर्ण केले, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करतांना राज्य शासनाने राबविलेल्या या योजनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सन्मान मिळाल्याचे सांगितले. सिंगापूर कॉन्सिलेटने त्यांच्या स्वातंत्र्य दिवसाला आमंत्रित केल्यानंतर उपस्थित 63 देशांच्या प्रतिनिधींनी एक महिन्यामध्ये 13 कोटी वृक्षलागवड कशी झाली, हे समजून घेतले. प्रशासन, समाज सेवी, सेलिब्रिटी, क्रीडापटू, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी एका मोहिमेमध्ये सहभाग घेतला.  वृक्षलागवडीमधील सजकता, सहभाग, झाडांचे संगोपन, त्यासाठी वापरण्यात आलेले नवीन तंत्रज्ञान, ग्रीनआर्मीमध्ये नोंदविलेला ऑनलाईन सहभाग यामुळे अमेरिकेच्या राजदूतांना देखील या मोहिमेचे आकर्षण निर्माण झाले. त्यांनी देखील माझा देश आणि तेथील जनता अशा पध्दतीच्या सार्वजनिक सहभागाची मोहिम राबवू शकेल काय यावर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
          राष्ट्रपती भवनात देखील चंद्रपूरच्या बांबूचे स्वागत झाले असून राष्ट्रपती भवनाचे कुंपण आता चंद्रपूरच्या बांबू संशोधन केंद्रातील विविध जातीच्या बांबूनी तयार होणार असल्याचे सांगितले. हैद्राबाद येथील राष्ट्रपती भवनात या संदर्भातील काम प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी महापौर अंजलीताई घोटेकर यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून एक भव्य व उपयोगी वास्तू उभी राहत असल्याचा आनंद व्यक्त केला. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी आपल्या संबोधनात  या देखण्यावास्तूमुळे ताडोबाची भेट लक्षणीय ठरेल, असे प्रतिपादन केले.
          मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांची बदली नाशिक येथे झाली आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात वनविभागाच्या विविध उपक्रमात दाखविलेल्या सहभागाबद्दल त्यांचा भाषणाच्या सुरुवातीला पुस्तक देवून वनमंत्र्यांनी सत्कार केला. वनविभागातील अधिका-यांनी आपल्या कार्यकाळात विविध संशोधन व नवनव्या प्रयोगामध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी शेवटी आनंद व्यक्त केला. नव्या विश्रामगृहाची दुरुस्ती व देखभाल या वास्तूच्या ख्यातीप्रमाणेच करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी शेवटी त्यांनी दिले.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केल. संचालन व आभार दत्तप्रसाद महादानी यांनी केले. अपर जिल्हाधिकारी सचिन कंलत्रे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, नगरसेवक सुभाष कासनगोटूवार, राजू गोलीवार व अन्य नगरसेवक उपस्थित होते
                                                          0000

No comments:

Post a Comment