चंद्रपूर, दि.30 ऑगस्ट- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुख कर्करोगाचे प्रमाण वाढत असून मोठ्या प्रमाणात कॅन्सर सारखे गंभीर आजार सर्वत्र फोफावत आहे. यामध्ये युवक वर्गाचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे नियंत्रण करण्याकरीता कोटपा कायदा 2003 हा अंमलात आलेला आहे. या कायद्यानुसार वेगवेगळया कलमानुसार दंड आकारण्यात येत आहे. तरी सुध्दा मोठया प्रमाणात शहरामध्ये या कायद्याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्यामुळे अति.जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग चंद्रपूर अंतर्गत तंबाखू नियंत्रण भरारी पथकाच्या माध्यमातून कोटपा कायदा 2003 चे उल्लंघन करणा-या चंद्रपूर शहरातील पान मटेरियल शॉप, पान सेंटर, सिनेमा टॉकीज, रेस्टॉरंट, बसस्टॉप, शाळा व कॉलेज परिसरात धाडी टाकून दंड वसूर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हा सल्लागार डॉ. कैलास नगराळे, मित्रांजय निरंजने, तुषार रायपूरे तसेच पोलीस विभागातील सुधाकर इटनकर, सुशील गेडाम यांनी कार्यवाही केली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात विकल्या जाणाऱ्या प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई करण्याचा सपाटा लावण्यात आला असून खर्रा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांवर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून दूर रहावे. या संदर्भात होणा-या अवैध विक्री विरुध्द जागृकता निर्माण करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment