स्वाधीन क्षत्रिय यांनी ग्रामपंचायत सेतू केंद्र आणि
तहसील कार्यालयाला दिली भेट
चंद्रपूर दि. 6 ऑगस्ट : राज्यातील सेवा हमी कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामीण भागात कशा पद्धतीने होते याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता आज लोक सेवा हमी आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे भेट दिली. त्यांनी वरोरा येथील सेतू केंद्र, तहसील कार्यालय व आनंदवन येथील ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामीण भागातील नागरिकांना भेटणाऱ्या सेवांची तत्परता आणि सुविधांचा दर्जा स्वतः तपासला.
राज्यसरकारने शासकीय कामकाजात गती, पारदर्शिता व ठराविक कालावधीमध्ये नागरिकांना हमखास सेवा मिळावी यासाठी 2015 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क हा अधिनियम कायदा केला. ऑनलाइन सेवा देणे, सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास अपील करण्याची नागरिकांना सुविधा असणे, आदि कायदयातील तरतुदीमुळे या कायद्याचे राज्यभरात नागरिकांनी स्वागत केले आहे. तथापि, या कायद्याला ग्रामीण भागामध्ये कसा प्रतिसाद आहे. हे जाणून घेण्यासाठी त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलेले स्वाधीन क्षत्रिय सध्या राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रत्यक्ष पाहणी दरम्यान जनतेमध्ये मिसळून त्यांच्याशी चर्चा करत अंमलबजावणीतील अडचणी समजून घेतल्या. नागपूर येथून दुपारी तीन वाजता वरोरा तहसिल कार्यालयात त्यांचे आगमन झाले. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, तहसीलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी संजय बोधले आदिंनी त्यांचे यावेळी स्वागत केले .
तहसिल कार्यालयात पोहचताच त्यांनी सेतू केंद्रावर रांगेत उभे असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. या ठिकाणी आर्थिक महिला विकास महामंडळातर्फ सेतू केंद्रात सेवा दिली जाते. यावेळी त्यांनी नागरिकांशी बोलताना आपल्याला सेवा मिळवण्यात काही त्रास आहे का ? संपूर्ण सेवा मिळतात का ? किती वेळ लागतो ? अशा प्रकारचे प्रश्न रांगेत नागरिकांना विचारले. त्यानंतर त्यांनी सेतू केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यंत्रसामुग्री, मनुष्यबळ याबाबतही प्रश्न जाणून घेतले. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयात सुद्धा भेट दिली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे या कायद्याची अंमलबजावणी करताना आपल्या अधिकाराचे वहन कशा पद्धतीने करतात. यामध्ये त्यांना कोणत्या अडचणी येतात, याबाबतची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीतील जिल्हयाची सद्यस्थिती व संदर्भात सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिवती तालुका व अन्य ठिकाणी नेट कनेक्टिव्हीटी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गम भाग असला तरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यालयाने सेवा हमी कायदा मध्ये अतिशय उत्तम कामगिरी केल्याचे यावेळी लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी आनंदवन ग्रामपंचायत या छोट्या ग्रामपंचायतीला भेट दिली. याठिकाणी सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणी केंद्राची व कामकाजाची पाहणी केली. केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्याची त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. सोबतच ग्रामसचिव व सरपंच आणि नागरिकांचे देखील संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी आनंदवनला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे व त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांशी चर्चा केली. आनंदवनमध्ये सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. स्वाधीन क्षत्रिय दोन दिवस चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. उद्या जिल्हयाचा आढावा ते घेणार आहेत.
No comments:
Post a Comment