नगर परिषद परिसरात रुग्णवाहिका, शववाहिका व घंटागाडीचे लोकार्पण
चंद्रपूर, दि.15 ऑगस्ट – बल्लारपूर शहरात गेल्या चार वर्षात कोटयावधींची विकास कामे झाली असून येत्या काही दिवसात हे शहर उत्तम नागरी सुविधांचे महाराष्ट्रातील शहर म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नगर परिषद परिसरात आयोजित एका कार्यक्रमात आज त्यांनी आमदार निधीतून रुग्णवाहिका, शववाहिका व घंटागाडीचे लोकार्पण केले.
या ठिकाणी आयोजित लोकार्पण सोहळयामध्ये बोलतांना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर परिसरात कोटयावधीच्या पायाभूत सुविधा उभ्या राहत असतांनाच या ठिकाणी राहणा-या नागरिकांना उत्तम नागरी सुविधा देण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार ॲड.संजय धोटे, बल्लारपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्ष मिनाताई चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी विपीन मुद्दा उपस्थित होते.
ना.मुनगंटीवार यांनी आज आपल्या विकास निधीतून 25 लक्ष किंमतीची अतिदक्षता रुग्णवाहिका, 13 लक्ष किंमतीचे शववाहिकेचे लोकार्पण केले. याशिवाय डब्ल्युसिएलच्या सामाजिक दायित्व निधीतून नगर परिषद परिसरात उभ्या राहणा-या एलईडी स्क्रिनचे देखील लोकार्पण करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानातंर्गत घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवालातील तरतूदीनुसार घरोघरी कचरा संकलनाकरीता 64 लक्ष रुपयाच्या 14 ॲटो टिप्परचे लोकार्पण करण्यात आले. सोबतच वैशिष्टयपूर्ण निधीतून नगर परिषद इमारतीवर सौर ऊर्जाप्रकल्प राबविण्यासाठी 11 लक्ष 55 हजार रुपयाचा सुक्ष्म ऊर्जा निर्मिती प्रकल्प लोकार्पित करण्यात आला. या प्रकल्पातून दररोज 40 ते 80 युनिट विज निर्मिती होणार आहे. यामुळे दरमहा 20 हजार रुपयाची बचत होणार असून 5 वर्षात या प्रकल्पावरील खर्च वसूल होणार आहे. यावेळी त्यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेतील सहभागासाठी नागरिकांचे अभिनंदन केले. स्वच्छ वार्ड स्पर्धाचे निकाल घोषित करण्यात आले. याशिवाय नगर परिषद कर्मचारी आरोग्य विमाचे स्मार्ट कार्ड प्राथमिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. याचा लाभ 173 कर्मचा-यांना होणार आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी बल्लारपूर शहरासोबतच बल्लारपूर तालुका देखील नागरी सुविधांसाठी ओळखला जाईल, असे सांगितले. या वर्षभरात बल्लारपूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये गॅस सिलींडरचा वापर सर्व महिला भगिनी करतील. हा तालुका महाराष्ट्रातील पहिला धूरमुक्त तालुका करण्याची आपली भूमिका असल्याचे सांगितले. बल्लारपूर नजिक अतिभव्य असे क्रीडा संकुल तयार होत असून या ठिकाणावरुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा मिशन शक्ती अतंर्गत आपला संकल्प असून विसापूर जवळ भव्य सैनिकी शाळा उभी राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
बल्लारपूर नगर परिषदेच्या अंतर्गत पहिली मुलींची डिजीटल शाळा आकाराला येत आहे. महाराष्ट्रातील देखणे असे बसस्थानक निर्माण होत आहे. हे बसस्थानक देखील बल्लारपूरच्या रेल्वे स्थानकाप्रमाणे या शहराचे नाव देशभर करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी गेल्या चार वर्षात राबविण्यात आलेल्या अनेक प्रकल्पाचा नामोल्लेख केला.
यावेळी नगराध्यक्ष हरिष शर्मा यांनी बल्लारपूर शहरासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी दाखविलेल्या विशेष आपुलकीबद्दल आभार मानले. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलत असून या ठिकाणच्या प्रगतीपथावर असलेल्या सर्व प्रकल्पाची पूर्तता झाल्यावर महाराष्ट्रातील आधुनिक नगर परिषद म्हणून या शहराचा नावलौकिक होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला नगर परिषदेच्या कर्मचा-यासह बल्लारपूर शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment