चंद्रपूर दि.2 ऑगस्ट - महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग म्हणून नावलौकिकास आलेल्या पालकमंत्री संगणक प्रशिक्षण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गेल्यावर्षी 119 शाळांमध्ये 7 हजार 711मुलांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पुढील वर्षी देखील 8 हजार विद्यार्थ्यांना या संगणक प्रशिक्षण मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या 942 शाळांमध्ये 38 हजार 300 विद्यार्थ्यांना याचा लाभ पुढील चार वर्षात मिळणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी या मोहिमेची सुरुवात केली होती. आज चंद्रपूर येथील ज्युबिली हायस्कूल येथे एका कार्यक्रमामध्ये या दुसऱ्या टप्प्याच्या संगणक वाहनाला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, निलेश पाटील उपशिक्षणाधिकारी किशोर काळे, ज्युबिली हायस्कूलचे प्राचार्य रवींद्र काळपांडे, विस्तार अधिकारी अरुण काकडे, मोरेश्वर बारसागडे, सीमएम फेलो व या प्रकल्पाच्या समन्वयक प्रियंका पारले यांच्या उपस्थित होते. यावेळी टाटा ट्रस्टच्यावतीने समन्वयक नीता निवळकर, संदीप सुखदेवे आदी उपस्थित होते. टाटा ट्रस्टच्या मदतीने सुरु झालेला हा अभिनव उपक्रम असून यामध्ये विद्या प्रतिष्ठानचा देखील सहभाग आहे.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीतील सर्व शाळा सध्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी अद्यावत डिजिटल क्लास निर्माण करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत या संगणक प्रशिक्षणाने विद्यार्थ्यांच्या संगणक साक्षरतेला मदत लागणार आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 5 सप्टेंबरला पालकमंत्र्यांच्याहस्ते दहा बसेस जनसेवेसाठी कार्यान्वित करण्यात आल्या. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, जिवती या तालुक्यामध्ये 119 शाळांच्या माध्यमातून 7711 मुलांना प्रशिक्षण देण्यात आले होते. आता या नव्या टप्प्यांमध्ये कोरपना आणि राजुरा या दोन तालुक्यांना यामध्ये जोडण्यात आले आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीतील सर्व शाळांना या माध्यमातून मदत केली जाणार आहे. पुढील वर्षभराच्या काळामध्ये 8 हजार विद्यार्थ्यांनावेगवेगळया 40 सत्रामध्ये प्रात्यक्षिक व याबाबतचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. यासाठी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानने अतिशय प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध केले आहेत. आज दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करताना गेल्या वर्षभरामध्ये मुलांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाची माहिती जिल्हाधिकारी खेमनार यांनी घेतली.
No comments:
Post a Comment