चंद्रपूर जिल्ह्यातील स्वच्छता अभियानासाठी तयार राहण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन
चंद्रपूर दि.4 ऑगस्ट - भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छता अभियानांतर्गत गुणांकन ठरविण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम 1 ते 31 ऑगस्टपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या सरपंचाने यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आव्हान केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी आज येथे केले.
चंद्रपूर येथे नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत कार्यक्रमांमध्ये उपस्थित सरपंचांना या संदर्भातील माहिती त्यांनी दिली. देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला असून ऑगस्ट महिन्यात यासंदर्भातील यंत्रणा कधीही आपल्या गावामध्ये येऊ शकते. त्यामुळे गावातील सार्वजनिक स्थळे, शाळा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे या सर्व ठिकाणची स्वच्छता पुढील काळात अद्यावत राहील यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर 50 लाख ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष व ऑनलाईन सहभाग नोंदवून घेतला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या निरीक्षणाचा देखील यामध्ये समावेश आहे. गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छ आग्रही, ग्रामपंचायत सदस्य, निगराणी समिती सदस्य,अंगणवाडी कार्यकर्ता, आशा आणि शिक्षक यांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या जाणार आहेत. या प्रतिक्रिया देताना गावातील स्वच्छता अभियानातील लक्षणीय उपलब्धी, संबंधित सर्वेक्षण करणाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
गावातील प्रतीष्ठीतांकडूनही ही समिती प्रतिक्रिया घेणार आहे. गाव स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेक्षण संस्थेच्या प्रतिनिधी सोबतही बैठकी करणार आहेत. केंद्र सरकारने विकसित केलेल्या मोबाईलवरील ॲपद्वारे नोंदवलेल्या प्रतिक्रिया सुद्धा याबाबत विचारात घेतल्या जाणार आहेत. वैयक्तिक शौचालयाची उपलब्धता व वापर, सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता व वापर, घनकचरा व्यवस्थापनासाठी गाव स्तरावर करण्यात आलेल्या सुविधा, स्वच्छतेबाबत गावातील प्रत्येकाला असणारी माहिती,त्यादृष्टीने त्यांचे असणारे वर्तन, या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गावागावात योग्य प्रकारे सूचना देण्याबाबतही या बैठकीत सरपंचांना सांगण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक गुण स्वच्छताविषयक सद्यस्थितीला देण्यात आले असून यासाठी 35गुण ठेवण्यात आले आहे. तर चर्चेद्वारे व ऑनलाईनद्वारे नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी 35 गुण ठेवण्यात आले आहेत. यासोबतच सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेसाठी 30 गुण ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पाहणी चमूला योग्य प्रतिसाद द्यावा व त्या पद्धतीने गावागावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, असे आवाहनही ना.अहिर यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देखील सरपंचांनी यासंदर्भात ग्राम सचिवांना देण्यात आलेल्या सूचना नुसार गावांमध्ये स्वच्छतेच्या उपाययोजना होत आहेत अथवा नाही याबाबत तपासणी करावी. गावामध्ये स्थानिक स्तरावर या उपक्रमाबाबत जनजागृती होईल यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी कोणत्या प्रकारासाठी किती गुण आहेत व कोणती खबरदारी घ्यावी याबद्दलचे सादरीकरण केले.
No comments:
Post a Comment