Search This Blog

Saturday, 4 August 2018

मुलांच्या शाळेपर्यंतच्या सुरक्षित प्रवासासाठी पालकांनी देखील जागरुक असावे : व्ही.एन.शिंदे

चंद्रपूर दि.2 ऑगस्ट : शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते यासंदर्भातील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे स्कूल बस व अन्य वाहनाबाबत पालकांनी जागरूक रहावे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी आज येथे केले.
आपला पाल्य, आपला मुलगा ज्या शाळेमध्ये शिकतो आहे. त्या शाळेतील वाहन व्यवस्थेबाबत पालकांनीदेखील जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने देखील या भागावर अतिशय लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक घरातला मुलगा शहरातील शाळांमध्ये जाताना अतिशय सुरक्षितरित्या शाळेमध्ये पोहोचला पाहिजे. याबाबत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार वाहनांच्या तपासणीची काळजी घेतली जाते.
तथापि, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, पालक आणि अन्य सर्वच घटकांनी याबाबत जागरूक असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. माननीय न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहनातून वाहतूक करण्यासाठी पालकवर्गामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या संदर्भात आज पालक व शाळेच्या परिवहन समिती सोबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जनजागृती मेळावा घेण्यात आला. पोलीस मुख्यालयात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना हेमराजसिंग राजपूत यांनी देखील शालेय वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्व घटकांनी करणे आवश्यक असून शाळा व्यवस्थापनाने याकडे मुख्यत्वे लक्ष घालावे, असे निर्देश दिले. प्रत्येकाच्या घरातील मुले ही लाख मोलाची असतात. त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक या वाहन व्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माननीय न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने देखील गाड्यांची तपासणी करताना काटेकोर नियमांचे पालन करावे, अशी सूचना देखील त्यांनी केली.
यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी देखील शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना  वेळोवेळी आमच्या मार्फत सूचना दिल्या जातात. तथापि, वाहन व्यवस्था ही मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात काम करत असते. त्यामुळे यासंदर्भातील शाळेच्या परिवहन समितीने अधिक बारकाईने लक्ष घालावे. तसेच शहरातील सर्व नागरिकांनी देखील कोणत्याही शाळेची बस असेल तरी अतिशय सुरक्षितरित्या  रस्त्यावर प्रवास करू शकेल व सुलभरीत्या शाळेत पोहोचू शकेल. अशा पद्धतीने शहराशहरात वातावरण निर्मिती करावी. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुख्याध्यापक पालक उपस्थित होते.
                                                 0000

No comments:

Post a Comment