लाल किल्यावरुन आदिवासी विद्यार्थ्यांचा
गौरव केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे मानले आभार
पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते चंद्रपूरमध्ये मुख्य ध्वजारोहण
चंद्रपूर, दि.15 ऑगस्ट- चंद्रपूरच्या आदिवासी आश्रमशाळेच्या मुलांनी एव्हरेस्ट सर केल्याच्या भीमपराक्रमाचा उल्लेख लाल किल्यावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाषणात केल्याबद्दल राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचे आभार मानले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळयामध्ये आगामी काळात जिल्हयामध्ये ‘ मिशन शक्ती ’ व ‘ मिशन सेवा ’ या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करुन चंद्रपूरच्या नावलौकिकात भर घालण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रतच नव्हे तर भारतात प्रेरणादायी उपक्रमाचा जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नावलौकिक वाढावे, यासाठी सिध्द व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या आजच्या भाषणात चंद्रपूर जिल्हयातील एव्हरेस्ट सर करणा-या 10 आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव केला. ‘एव्हरेस्ट शिखर अनेकांनी सर केले. मात्र संधी मिळाल्यानंतर चंद्रपूरच्या 10 शाळकरी मुलांनी देखील हा भीमपराक्रम केल्याचा इतिहासात कायम उल्लेख केला जाईल,’ असे प्रधानमंत्र्यांनी विषद केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या उल्लेखाला ऐतिहासिक संबोधले असून त्यासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. येणा-या काळामध्ये भारतातील 712 जिल्हयामध्ये जात, पात, धर्म, वंश या सर्व भेदाच्या पलिकडे जावून गुणवत्तेच्या आधारावर जिल्हयाचा नावलौकिक वाढवायचा असून प्रेरणादायी जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव देशात घेतले जाईल, यासाठी तत्पर होण्याचे आवाहन केले.
आपल्या भाषणामध्ये त्यांनी ‘ मिशन शक्ती ’ व ‘ मिशन सेवा ’ या दोन महत्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली. मिशन शक्तीअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील सर्वस्तरातील क्षमतावाण शंभर खेळाडूंना निवडण्यात येईल. त्या माध्यमातून सहा निवडक खेळामध्ये या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल व 2024 मध्ये ऑलिम्पिकसाठी गुणवान खेळाडूंना तयार केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयातील सर्व तालुक्याच्या ठिकाणच्या क्रीडा संकुलाला 25 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. चंद्रपूरमध्ये स्वातंत्रवीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीत भव्य क्रीडा संकुल उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. आतापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला केवळ 28 मेडल प्राप्त झाले आहे. मात्र यासाठी कठोर मेहनत चंद्रपूर जिल्हा घेणार असून ऑलिम्पिक मेडल हे आमचे पुढील धेय्य असेल त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच त्यांनी ‘ मिशन सेवा ’चीही घोषणा केली. चंद्रपूर, मूल व जिल्हयाच्या अन्य भागात मोठया प्रमाणात अभ्यासिका निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आयएएस, आयपीएस अशा महत्वपूर्ण सेवामध्ये चंद्रपूरच्या मुलांचे प्रतिनिधीत्व असले पाहिजे, कोणत्याही क्षेत्रात व प्रदेशात या भागातील मुले उच्चपदस्थ ठिकाणी असावीत, यासाठी प्रयत्नपूर्वक प्रशिक्षणाचे नियोजन आगामी काळात करण्यात येईल व ‘मिशन सेवा’च्या माध्यमातून सक्षम व चारित्र्यवान अधिकारी निर्माण करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी वेळी केली.
यावेळी जिल्हयात सुरु असलेल्या वेगवेगळया योजना व उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या जिवनात अमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
बांबू प्रशिक्षण केंद्रामार्फत रोजगार निर्मितीच्या उपक्रमाचे त्यांनी आपल्या भाषणात विशेष कौतुक केले. या प्रशिक्षण केंद्रामार्फत मोठया प्रमाणात महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. 50 हजार राख्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत तयार झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. सिंगापूरच्या कॉन्सीलर जनरलने आपल्याला त्यांच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळयाला आमंत्रित करुन बांबू संशोधन व प्रशिक्षणासंदर्भात आम्ही सुरु केलेल्या प्रयोगाची माहिती घेतली. बांबूमुळे अनेक देशाशी चंद्रपूरचा संबंध प्रस्तापित होत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हयामध्ये येणा-या काळात अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, हजारो प्रजातींच्या वनसंपदा असणारे बॉटनिकल गार्डन, मध्य भारतातील सर्वात मोठे कॅन्सर हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत सर्व तालुक्यात बगिचे, अभ्यासिका, सांस्कृतिक केंद्र उभी राहत असल्याचे स्पष्ट केले. हा जिल्हा रोजगार युक्त जिल्हा करण्यासाठी कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी या देशासाठी बलिदान करणा-या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले. भारत माता की जय म्हणतांना भारत मातेसाठी काही तरी करण्याचा हा संकल्प करण्याचा आजचा दिवस असल्याचे नमूद करुन प्रत्येकांनी यासाठी स्वयंप्रेरणेने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
त्यांच्या भाषणानंतर त्यांनी कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल दत्तात्रय गुंडावार यांचा सत्कार केला. उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस महासंचालक पदक मिळवणारे उपपोलीस निरीक्षक संदीप मिश्रा तसेच महसूल विभागातील तहसिलदार राजेश सरवदे, नायब तहसिलदार आर.एन.कुळसंगे, आर.व्ही लक्कावार, विक्की गुप्ता, नितून मडावी, गुणवंत वाभीडकर, जयंवत मोरे, राजू मोरे, अमोल तोडावे या अधिकारी कर्मचा-यांचा विशेष कार्यासाठी सत्कार केला. याशिवाय माजी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत 50 हजार रुपयाचे एफडी प्रमाणपत्र 9 बालिकांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर या ध्वजारोहणासाठी आलेल्या कला, क्रीडा व अन्य क्षेत्रातील मान्यवरांसोबत पालकमंत्री महोदयांनी चहापान केले. यावेळी आमदार नाना शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, स्वातंत्र सैनिक, गणमान्य व्यक्ती व जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment