चंद्रपूर, दि.31 जुलै- राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्हयात 13 कोटी वृक्षलागवडीमध्ये जिल्हयाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. चंद्रपूर जिल्हयात 69 लाख 84 हजार 421 वृक्षलागवडीचा विक्रम यावर्षी झाला असून सांयकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा महाराष्ट्रामध्ये तिस-या क्रमांकावर होता.
राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचा विक्रम राज्यात केला आहे. पहिल्या वर्षी 2 कोटी, दुस-या वर्षी 4 कोटी तर तिस-या वर्षी 13 कोटी वृक्षलागवडीचे आवाहन त्यांनी केले होते. सामान्य नागरिकांच्या पसंतीला पडलेल्या या मोहिमेला यावर्षी सर्वाधिक प्रतिसाद नांदेड जिल्हयाने दिला आहे. त्या पाठोपाठ मागील वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हयाचा क्रमांक येतो. 31 दिवसांमध्ये सर्वाधिक वृक्षलागवडीचे नोंद 5 जुलैला करण्यात आली. जिल्हयात या दिवशी 4 लाख 89 हजार 102 वृक्षलागवड झाली आहे. राज्यात 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये 13 कोटीचे आवाहन करण्यात आले होते.
तथापि, चार दिवस आधीच ही वृक्षलागवड 13 कोटीच्यावर गेली. राज्यामध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत 14 कोटी 71 लाखावर वृक्षलागवड करण्यात आल्याचे जाहिर केले. वृक्षलागवडीच्या या यशस्वी मोहिमेसाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. यामध्ये चंद्रपूरचा देखील मोठा हातभार असल्याचे समाधान जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले असून सहभागी झालेल्या सर्व यंत्रणांचे आभार व्यक्त केले आहे.
31 दिवसात वनविभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार वनविभागाने 31 जुलैपर्यंत 31 लाख 10 हजार 375 वृक्षलागवड केली आहे. त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाने 14 लाख 51 हजार 38 वृक्षलागवड केली आहे. चंद्रपूर जिल्हयातील अन्य विभागांमध्ये ग्राम पंचायतीमार्फत 9 लाख 85 हजार वृक्षलागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत 3 लाख 66 हजार 324 वृक्ष लावले आहे. शैक्षणिक संस्थांनी 1 लाख 42 हजार, कृषी विभागाने 2 लाख 49 हजार वृक्षलागवड केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 लाख 14 हजार, नगर विकास विभागाने 1 लाख 21 हजार वृक्षलागवड करुन उल्लेखनिय कार्य केले आहे.
No comments:
Post a Comment