माध्यम प्रतिनिधींसाठी फेक न्यूज संदर्भात कार्यशाळेचे आयोजन
चंद्रपूर दि.1 ऑगस्ट : नव्याने जनसामान्यांच्या हातात आलेल्या समाज माध्यमांना बळकट होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे हे माध्यम कायद्याच्या चौकटीत बसेपर्यंत यावरील सज्जनांची सक्रियता वाढविणे गरजेचे आहे. हे काम माध्यमातील जागरुक सकारात्मक वृत्तीने, स्वयंप्रेरणेने करणे गरजेचे आहे. दुर्जन सक्रिय व सज्जन हतबल हे सध्याच्या समाज माध्यमावरील चित्र बदलणे गरजेचे असल्याचा सूर आज चंद्रपूरमध्ये आयोजित ‘फेक न्युज व सायबर क्राईम’ या संदर्भातील कार्यशाळेमध्ये व्यक्त करण्यात आला.
चंद्रपूर येथे स्थानिक चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात श्रमिक पत्रकार संघ व जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली दरवर्षी श्रमिक पत्रकार संघात अर्पण करण्यात येते. याच कार्यक्रमासोबत माध्यमांसाठी आज एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके, चंद्रपूर पोलीस प्रशासनातील सायबर सेलचे प्रभारी विकास मुंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सर्वच वक्त्यांनी सध्याच्या काळात व्हाटस्ॲप सारख्या समाज माध्यमाने अनेक चुकीच्या बातम्या, अफवा पसरविण्याचे काम सुरू केले असल्याचे स्पष्ट केले. फेसबुक, व्हाट्सअप ही समाज माध्यमे एकीकडे जागतिक राजकारण बदलत असताना भारतीय समाज जीवनावर देखील याचा प्रभाव पडत आहे. व्यक्तिगत निंदानालस्ती सोबतच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चुकीचे संदेश समाजामध्ये पेरले जातात. त्यामुळे या समाज माध्यमाचे सर्वांनी पुढाकार घेऊन ऑडिट करणे गरजेचे आहे. या ठिकाणी कोणी जबाबदार नाही, असे होता कामा नये. ही माध्यम समाजामध्ये बळकट होईपर्यंत या संदर्भातील कायदे तयार होईपर्यंत आमची समाज व्यवस्था खिळखिळी करून सोडू नये याची काळजी सर्वांनीच घेणे गरजेचे असल्याचे यावेळी वक्त्यांनी स्पष्ट केले. महापुरुष, जाती-धर्म शासनाविरुद्ध खोटी माहिती या संदर्भातली कोणतीही पोस्ट आली तर या पोस्टमुळे कोणाचा फायदा होणार ? यामध्ये चूक आहे की बरोबर आहे ? याबाबतची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही प्रतिपादन यावेळी केले. सायबर सेलचे प्रभारी विकास मुंडे यांनी समाज माध्यमांद्वारे व्यक्तिगत मानहानी व आर्थिक विषयी होत असलेल्या गुन्ह्यांमधील वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात होत असलेल्या गुन्ह्यांची काही उदाहरणे सांगितली. यावेळी पत्रकारांसोबत संवाद करताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. बंडू लडके यांनी या नव्या माध्यमाला सामोरी जाताना स्वतः काही नियम पाळणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. संजय तुमराम यांनी देखील यावेळी बोलताना नव्या माध्यमाला न्याय देताना अधिक जबाबदारीने समाजातील प्रत्येकाने आपली भूमिका अदा करण्याचे आव्हान केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यम प्रतिनिधी पुढे केलेले फेक न्यूज संदर्भातील भाषण प्रोजेक्टरव्दारे उपस्थित माध्यम प्रतिनिधींना ऐकवण्यात आले. कार्यक्रमाला वेगवेगळ्या माध्यमांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.
000000
No comments:
Post a Comment