70 लाख वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाचा शुभारंभ
मी सहभागी झालो, आपणही सहभागी व्हावा, मोहिमेला सुरुवात
जिल्हयात जिल्हा परिषदेच्या वृक्षदिंडीची धुम
ग्रिनअर्थ ऑर्गनायझेशनची वृक्षदिंडी आज सकाळी चंद्रपूरात
चंद्रपूर, दि.01 जुलै – आम्ही लावले तुम्हीही सहभागी व्हावा, जिल्हयातल्या प्रत्येक नागरिकांने पुढील एक महिन्यात एक वृक्ष लावावा, या आवाहनासह चंद्रपूर जिल्हयात आज विविध ठिकाणी विविध विभागामार्फत वृक्षलागवडीला सुरुवात झाली. जिल्हयाने या वर्षी 75 लाखापेक्षा अधिक वृक्षलागवडीचे आव्हान घेतले आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात गेल्या दोन वर्षात वृक्षलागवडीच्या मोहीमेला सुरुवात झाली. आज मुंबई नजीक कल्याण जवळील वरपगांव येथून राज्यस्तरीय 13 कोटी वृक्षलागवडीच्या मोहीमेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सुरुवात करणार आहेत. त्यांच्या या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशिवाय वेगवेगळया क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र त्याचवेळस चंद्रपूर जिल्हयामधून त्यांच्या या मोहीमेला बळकटी देण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकावे व स्वत: एक वृक्ष लावावे, असे आवाहन वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी बल्लारपूर येथील कार्यक्रमात केले.आमच्या जिल्हयाचे दायित्व मोठे असून ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्हयातून सर्वाधिक वृक्षलागवड झाली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले . प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावावा व जोपासावा असेही त्यांनी सांगितले . तर रामबाग येथे आज सकाळी वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांसह वृक्षलागवडीच्या मोहीमेला विधीवत सुरुवात करतांना यावेळी आम्ही अपेक्षीत लक्षापेक्षा अधिक काम करण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी व्यक्त केले आहे.
चंद्रपूर जिल्हयामध्ये आजपासून ही मोहीम सुरु झाली असून बल्लारपूर नगर परिषदेने नगराध्यक्ष हरीष शर्मा यांच्या मार्गदर्शनात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन बल्लारपूर येथे केले आहे. जिल्हयामध्ये27 जूनपासून जिल्हा परिषदेने अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात वृक्षदिंडीला सुरुवात केली आहे. त्यांचा एक चित्ररथ जिल्हाभरात फिरत असून जिल्हा शिक्षण विभागाच्या मार्फत प्रत्येक विद्यार्थी व कर्मचारी एक झाड लावणार आहे. जिल्हयातील स्वयंसेवी संस्था व विविध समाज सेवी संघटनांनी देखील या काळात वृक्षलागवडीचे कार्यक्रम आयोजित केले आहे. चंद्रपूर महानगर पालिका , जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे .
आज झालेल्या अन्य एका रामबागमधील मुख्य कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्यासह उपवनसंरक्षक मध्य चांदा गजेंद्र हिरे, विभागीय वनाअधिकारी अशोक सोनकुसरे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी शरद करे, भालचंद्र ब्राम्हणे, राम धोत्रे, 13 कोटी वृक्षलावगडीचे समन्वयक अभय बडकल्लेवार, सेवानिवृत्त वनाधिकारी राजू पवार, शैलेद्रसिंग बैस, अमोल बैस आदी मान्यवर उपस्थित होते. तर बल्लारपूर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
आज मुख्य कार्यक्रम
चंद्रपूर जिल्हयात वनविभाग व संबंधीत संस्थांनी यावर्षी रेकार्डब्रेक वृक्षलागवड करण्याची व वृक्ष संवर्धन करण्याची मोहिम आखली असून मुख्य कार्यक्रम 2 जुलै रोजी आमदार अनिल सोले यांच्या वृक्षदिंडीने होत आहे. 1 जुलै रोजी चंद्रपूर जिल्हयातील पोंभूर्णा येथे सांयकाळी 6 वाजता पोहचणार आहे. तर चंद्रपूर वनविभागात सकाळी 9 वाजता जिल्हयातील वृक्षरोपनाच्या कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ केला जाणार आहे. यावर्षी वनविभागाने 27 लाख 50 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाने 25 लाख 55 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. चंद्रपूर जिल्हयातील अन्य विभागांमध्ये ग्राम पंचायतीमार्फत 9 लाख 2 हजार 257, सामाजिक वनीकरण विभागामार्फत 4 लाख, ग्रामविकास विभागामार्फत 2 लाख 48 हजार, कृषी विभागामार्फत 2 लाख, शिक्षण विभागामार्फत 1 लाख 52हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे 1 लाख 18 हजार, वृक्षलागवड करण्यात येणार आहे. उद्योग विभागामार्फत 60 हजार 300, सहकार विपणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत 44 हजार, ऊर्जा विभागामार्फत 35हजार 10 वृक्षलागवड होणार आहे. 2 जुलैला मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक ऋशीकेश रंजन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार रामदास आंबटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, ग्रिनअर्थ आर्गनायझेशनचे आमदार प्रा.अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या शिवाय या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित राहणार आहेत. मुख्य वनसंरक्षक कार्यालयात नागपूर रोडवरील सिव्हील लाईन चंद्रपूर येथे सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी वनविश्रामगृहाच्या रामबाग येथील वनविश्रामगृहातून सकाळी 9 वाजता वृक्षदिंडीला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment