Search This Blog

Monday 18 October 2021

सूक्ष्म नियोजनाद्वारे जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करा



सूक्ष्म नियोजनाद्वारे जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करा

- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि.18 ऑक्टोबर : जिल्ह्यातील लसीकरणाच्या उद्दिष्टपुर्तीसाठी आरोग्य विभागाच्या टिम  नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तरच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आरोग्य यंत्रणेने गावपातळीवर लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करुन 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, नगर प्रशासन विभागाचे अजितकुमार डोके तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  लसीकरण हे कोवीड प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील एक महत्वाचा टप्पा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यामध्ये मिशन कवचकुंडल मोहिमेअंतर्गत 94 हजार 487 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आरोग्य विभागाने उर्वरित नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करण्यासाठी व लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तरच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठता येईल.

ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याकरीता ग्रामस्तरावर लोकप्रतिनिधी, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, सरपंच,आशासेविका, कोतवाल यांच्या तालुक्याच्या ठिकाणी नियमित आढावा बैठका घ्याव्यात. ज्या गावातील 400 किंवा 500 च्या वर नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे, अशा गावांची यादी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बैठकीत उपस्थितांना दिल्या.

16 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात 12 लक्ष 54 हजार 996 नागरीकांचा पहिला डोस तर 4 लक्ष 10 हजार 201 नागरिकांचे दोन्ही डोस असे एकूण 16 लक्ष 65 हजार 197 डोस देण्यात आले आहेतजिल्हयात 1 लक्ष 38 हजार 330 इतका लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामूळे 18 ते 44 वर्ष वयोगटातील बऱ्याच नागरीकांचे लसीकरणाचे पहिला व दुसरा डोस अद्याप शिल्लक असून अशा नागरीकांनी पुढे येऊन लसीकरण करुन घ्यावे. तसेच जिल्ह्यात लसीकरणासाठी 60 वर्षावरील नागरिकांकडून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदिप गेडाम यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.गुल्हाने यांनी कोविड लसीकरणाची ग्रामिण भागातील सद्यस्थिती तसेच  तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ऑक्सीजन प्लाँट, उपलब्ध व्हेंटिलेटर याबाबत माहिती जाणून घेतली.

00000

No comments:

Post a Comment