Search This Blog

Wednesday 20 October 2021

कृषी विभागामार्फत 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत

 


कृषी विभागामार्फत 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत

हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह मोहीम

Ø रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना 38 कोटी अनुदानाचा मिळणार लाभ

चंद्रपूर दि. 20 ऑक्टोबर: राज्यात  दि. 18 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अनुदानित हरभरा बियाण्यांचा लाभ घेऊन हरभऱ्याचे उत्पादन व उत्पादकता वाढवावी, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

यावर्षी राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी अतिशय पोषक असे वातावरण आहे. मागील वर्षी हरभरा पिकाची 26 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. यावर्षी हे क्षेत्र वाढून 30 लक्ष हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे. रब्बी हंगामामध्ये पेरणी होणाऱ्या एकूण क्षेत्रात हरभरा पिकाचे क्षेत्र अंदाजे 50 टक्के आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके व बियाणे लागवड उपअभियान, ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

हरभरा पिकाचे पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरवीजी 202 व बीडीएनजीके 798 या वाणांचे एकूण 1 लक्ष 97 हजार क्विंटल हरभरा बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यापैकी 23 हजार क्विंटल प्रात्यक्षिकासाठी लागणारे बियाणे शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत वितरीत करण्यात येणार आहे.

कृषी विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे वितरणासाठी रु.2500 प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार आहे. हरभरा पिकासाठी येत्या रब्बी हंगामात एकूण 38 कोटी अनुदानाचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्‍टर मर्यादेत लाभ देय आहे. तसेच ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत 1 एकर मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या  योजनेचा लाभ घेण्याचे  आवाहन  करण्यात  आले आहे.

00000

No comments:

Post a Comment