चंद्रपूर दि. 7 डिसेंबर : सर्वांना नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे अगदी छोटया स्तरावर का होईना उद्योगधंदा उभारण्यासाठी सुरुवात करा. धडपड कधीच वाया जाणार नाही. कौशल्य विकास देणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करा. असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी आज युवकांशी संवाद साधताना केले.
दिनदयाळ अंत्योदय योजना –राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान,चंद्रपूर,जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजिकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जैन भवन येथे या रोजगारे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी विविध कंपन्याकडून उमेदवारांची मुलाखत व माहिती गोळा करण्यात आली. शेकडो तरुणांनी संबंधित कंपन्यातील रिक्त जागांसाठी आपली उमेदवारी दाखवली. याठिकाणी विविध प्रशिक्षण संस्थाकडून स्टॉल लावण्यात आले होते. याशिवाय मुद्रा बॅक, विविध महामंडळ व लोकराज्यचा स्टॉल लावण्यात आला होता.
या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, एमआयडीसी इंड्रस्ट्रीज असोशिशनचे अध्यक्ष मधुसूदन रुघटा यांच्या सह उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभापती अनुराधा हजारे, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपआयुक्त विजय देवळीकर, सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास सुनंदा बजाज, चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिघवी, गोपाल एकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानावरून बोलतांना एमआयडीसी इंडस्ट्रीज असोशिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंघटा यांनी व्यावसायिक होण्यासाठी सचोटी व मेहनतीसोबत एक पाऊल पुढे टाकण्यासाठी हिम्मतही आवश्यक असल्याचे सांगीतले. श्रीमती सुनंदा बजाज यांनी यावेळी कौशल्य विकास विभागाबाबत सुरु असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या रोजगार मेळाव्याला जिल्हा भरातील तरुणांनी उपास्थिती लावली होती.
0000000
No comments:
Post a Comment