Search This Blog

Wednesday, 29 November 2017

उदयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचनाला वेळ दया -- कल्पना निळ



साहित्य, कला, संस्कृतीचा ग्रंथोत्सव थाटात संपन्न

चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर – चंद्रपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून साहित्य, कला, संस्कृती आणि वाचन चळवळीला उजागर करणा-या ग्रंथोत्सवाचा आज समारोप झाला. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने व सहभागाने गाजलेल्या या संमेलनातून वाचन संस्कृतीला बळकटी आणण्याचा संदेश दिला गेला. ‘उदयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन ही गुंतवणूक असल्याचा’, सल्ला उपजिल्हाधिकारी कल्पना निळ यांनी समारोपाच्या कार्यक्रमात गुणवंताना दिला.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद चंद्रपूर, चंद्रपूर माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती चंद्रपूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 28 व 29 नोव्हेंबर या काळात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात हा वाचन संस्कृतीला बळकटी देणारा समारंभ पारपडला. वाचनाचे विविध अंग म्हणून पुढे आलेल्या व्याख्यान, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, वादविवाद, विविध कलागुणांना सादर करण्याची संधी या ग्रंथोत्सवातून देण्यात आली. 28 तारखेला ग्रंथदिंडीने जनजागरण करणा-या या ग्रंथोत्सवाला उत्तोरत्तर चांगल्या कार्यक्रमांनी रंगत भरल्या गेली. ग्रंथोत्सवा दरम्यान झालेल्या परिसंवादामध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सिटी कन्या विद्यालयाच्या मानसी विश्वकर्मा प्रथम तर ज्युबली हायस्कुलची जेबा सेल्‍वीम व्दितीय ठरली. या परिसंवादचे अध्यक्ष सुरेश चोपणे होते. 13 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. कवी संमेलनामध्ये लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुलींनी आपले वर्चस्व नोंदविले. यामध्ये स्मृध्दी आगलावे व मेहवीश शेख या मुलींनी प्रथम व व्दितीय क्रमांक घेतला. या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख होते. 15 विद्यार्थी कवीनी आपल्या रचना सादर केल्या. व्याख्यानाच्या आजच्या पहिल्या सत्रात श्री.प्र.ग.तल्लवार यांच्या अध्यक्षतेत डॉ.पद्मरेखा धनकर, प्रा.अशोक माथनकर यांनी वाचन संस्कृती आणि ग्रंथालय या विषयावर मंथन केले. या सत्राचे सूत्र संचालन अनिता अडबले यांनी केले. कथाकथनामध्ये 13 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कथाकथनामध्ये भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या प्रणय उपरे यांनी प्रथम तर प्रियदर्शनी लधवे व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली. शिक्षकांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी होते. 13 शिक्षकांनी यावेळी कवीता सादर केल्या. या सत्राचे संचालन भागवतकर यांनी केले. शिक्षकांच्या कवी संमेलनात महात्मा कनिष्ठ महाविद्यालयाचे राहूल दहिवले यांची कवीता उल्लेखनिय ठरली. वादविवाद स्पर्धेमध्ये 18 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. श्रध्दा खनके व पलक खसारे या विद्यार्थींनी सूत्र संचालन केले. वादविवाद स्पर्धेमध्ये लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाची वैष्णवी चिंचोळकर, सिटी कन्या विद्यालयाची दिक्षा चौधरी प्रथम व व्दितीय ठरली.
ग्रंथदिंडी आयोजनाचा प्रभार सुदर्शन बारापात्रे, किरण पराते, किरण कात्रोजवार, संजय अंडूसकर यांनी घेतला. तर जिल्हा परिषद ज्युबली हायस्कूलच्या स्वर्गीता खंडाळे, कादंबी ठेमस्कर यांनी रांगोळी रेखाटून संमलेनाची रंगत वाढविली.
समारोपाच्या कार्यक्रमामध्ये उपजिल्हाधिकारी कल्पना निळ यांनी सन 2016-17 मध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अभ्यास करुन वेगवेगळया शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या 23 स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी बोलतांना त्यांनी वाचन ही गुंतवणूक असून विद्यार्थी दशेमध्ये केलेली मेहनत आयुष्य घडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचनासाठीच्या वेळेचे नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, जिल्हा ग्रंथपाल आर.जी.कोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके होते. या समारोपीय समारंभाचे सूत्र संचालन प्रशांत आर्वे यांनी केले. यावेळी ग्रंथोत्सवाला यशस्वी करण्यासाठी कार्य केलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

000

No comments:

Post a Comment