Search This Blog

Monday 6 November 2017

शेतक-यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा ठरतेय आधार चंद्रपूर जिल्हयात 44 शेतक-यांना 88 लाखांचे वाटप

चंद्रपूर, दि.3 नोव्हेंबर- राज्य सरकारने शेतक-यांच्या उत्पन्न वाढ, कर्जमाफी, शाश्वत शेती या विविध योजनांसोबत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अघटीतांमध्येही साथ देण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना सुरु केली आहे. या योजनेतून जिल्हयातील 44 शेतकरी कुटुंबाला 88 लाखांची मदत झाली आहे.
शेतकरी कुटुंबावर झालेल्या कुठल्याही नैसर्गिक आघातामध्ये शासनाच्या कृषी विभागाकडून ही मदत मिळते. यासाठी शेतक-यांनी नजीकच्या तालुका कृषी अधिका-यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. आपल्या असपासच्या शेतकरी कुटुंबात अपघात किंवा नैसर्गिक आघात झाल्यास त्यांना मदतीसाठी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हयात 88 लाखाची मदत 
दुर्दैवाने अपघात होवून बळीराज्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशावेळी कुटूंबप्रमुख बळीराजा जर दगावला किंवा अपंग झाला, तर कुटूंब आर्थिक संकटात सापडते. या परिस्थितीत शेतक-यांच्या कुटूंबाला मोठ्या हिंमतीने सावरावे लागते.  दुर्दैवाने अपघात झाल्यास राज्य शासनातर्फे स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत विम्याची मदत दिली जात आहे. त्यासाठी शासनाने सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा उतरविला आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंबाला अशा प्रसंगी विम्याची हमखास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात सन 2016 मध्ये 93 मृत शेतक-यांचे प्रकरण या प्राप्त झाले होते. त्या 44 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना योजनेतंर्गत 88  लक्ष रूपयांची मदत देण्यात आली आहे. तर 10 प्रकरणे नामंजूर करण्यात आले असून 39 प्रकरणे शेतक-यांकडून कागदपत्राची पूर्तता होण्यासाठी प्रलंबित आहे.

कसा मिळतो लाभ !
या योजनेतंर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लक्ष रूपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी  झाल्यास एक लक्ष रूपये मदत  दिल्या जाणार आहे. या लाभासाठी लाभार्थ्यांकडे सात बारा प्रमाणपत्र, 6 , 6 ड (फेरफार) आदी पात्रता असावी.  
विमा संरक्षणासाठी रस्ता/रेल्वे अपघात, उंचावरून पडणे, बुडून मृत्यू, सर्पदंश, प्राणीदंश, खून, जनावराचा हल्ला, दंगल, वीज पडणे, विषबाधा, नक्षलवादी हल्ला व इतर अपघात आदींमधील अपघातांचा समावेश आहे. विम्याचा दावा करण्यासाठी दावा पत्र, वारसा नोंद, शेतकऱ्याचा वयाचा पुरावा, पोलीस (एफ आय आर) किंवा जवाब, बँक पासबुक प्रत, सातबारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, 6 ड (फेरफार), उतारा 6 , शव विच्छेदन अहवाल, पोलीस स्थळ पंचनामा, अपंगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, मृत्यू प्रमाणपत्र व पोलीस मरणोत्तर पंचनामा आदी कागदपत्रे आवश्यक आहे. राज्यातील जवळपास 1.37 कोटी खातेदार शेतकऱ्यांचा विमा शासनाने उतरविला आहे. विम्याचा हप्ताही कंपनीकडे सुपूर्द करण्यात आला  आहे. दुर्देवाने अपघात झाल्यास अशा संकटसमयी केवळ कृषि कार्यालयात अर्ज भरून अपघातग्रस्त शेतकरी कुंटूंबीय विम्याची मदत मिळवू शकतात. एवढी सुटसुटीत लाभाची ही योजना आहे.  या योजेनंतर्गत जिल्हयात सन 2017 मध्ये आतापर्यंत 39 मृत शेतक-यांचे प्रकरणे प्राप्त झाले आहे. त्यामध्ये एक प्रकरण मंजूर करण्यात आला असून 17 परिपूर्ण प्रकरणे विमा कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. तर 21 शेतक-यांची प्रकरणे त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.

कुठून मिळते मदत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबंधित जिल्हा/तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसहीत अर्जासह दावा दाखल करण्यात यावा. याकरिता कोणताही वकील किंवा एजंट नेमण्याची आवश्यकता नाही. तरी अपघातग्रस्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येते. या योजनेमुळे घरातील कर्ता पुरूष शेतकरी गेल्यामुळे हवालदील झालेल्या शेतकरी कुटूंबाला ही आर्थिक मदत जगण्याचे बळ देवून जाते.

0000

No comments:

Post a Comment