चंद्रपूर, दि.3 नोव्हेंबर- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शी शासन व्यवस्थेच्या आवाहानाला प्रतिसाद देत राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने सुरु केलेल्या ‘आपले सरकार’ वेबपोर्टलला चंद्रपूर जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पुढे आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकीकडे डिजीटल शाळा, हॅलो चांदा अशा पारदर्शी संपर्क यंत्रनांना बळकटी देणे सुरु केले असतानाच जिल्हयात महसूल विभागाने ऑनलाईन वेबपोर्टलच्या मार्फत 1 लाख 69 हजार डिजीटल प्रमाणपत्राचे वाटप केले आहे.
महाराष्ट्रामध्ये डिजीटल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात ऑक्टोंबर महिन्यात यवतमाळ पहिल्या क्रमांकावर असून नाशिक पाठोपाठ चंद्रपूरने तीसरा क्रमांक पटकावला आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा प्रथम ठरला आहे. नागरिकांनी ऑनलाईन सेवेचा अधिकाधिक फायदा घेऊन पारदर्शी प्रक्रियेला बळकट करावे, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात डिजीटल व्यवहाराला राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चालना दिली आहे. नव्या पिढीला संगणकाच्या माध्यमातून डिजीटल युगात सक्षम करण्यासाठी त्यांनी शाळांना पालकमंत्री संगणक प्रशिक्षण प्रयोग शाळेमार्फत बळकट करण्याचे धोरण अंवलबले आहे.
जिल्हयात डीजीटल इंडिया, डीजीटल महाराष्ट्र ह्या संकल्पनेची कास धरून चंद्रपूर जिल्ह्यातही महसूल विभागाने प्रगतीचे पाउल उचलले आहे. 2015 च्या महाराष्ट्र शासनाच्या सेवा हमी कायद्यानुसार आता नागरिकांना निर्धारित वेळेत सेवा देणे संबंधित विभागास बंधनकारक आहे. जर विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अर्जदार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे संबंधित सेवेसाठी अपील करू शकतात. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेबपोर्टलवर एकूण 39 विभागाच्या 399 सेवा प्रत्येक विभागाने सेवा अधिनियमानुसार अधिसूचित केलेल्या आहेत. त्यात महसूल विभाग, गृह विभाग, समाजकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, पंचायत राजविभाग, कामगार विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उर्जा विभाग, नगर विकास विभाग, सहकार विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग इत्यादींचा समावेश आहे. यातील महसूल विभागातील सेवांची अंमलबजावणी म्हणून नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांचे मार्गदर्शनाखाली आपले सरकार पोर्टलचा जिल्ह्यात वापर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महसूल विभाग नागरिक सेवा उत्पन्न प्रमाणपत्र, वय, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, ऐपत प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असे 18 प्रकारचे प्रमाणपत्र संपूर्णतः ऑनलाइन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पूर्णपणे आपले सरकार या पोर्टलचा वापर करण्यात येत आहे. यामुळे नागरिक घरबसल्या आपल्या सोयीनुसार आपली विविध प्रकरणे, अर्ज ऑनलाईन सादर करू शकतात व आवश्यक त्या शुल्काचा भरणा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होतो. यात त्यांना कार्यालयात जायची गरज पडत नाही. यामुळे नागरिकांचा वेळ त्रास व पैसा वाचतो आहे. ऑनलाईनमुळे प्रकरणावर होणारी कार्यवाही व प्रलंबित अर्ज, निकाली अर्ज, त्रुटीतील अर्ज यांची माहिती मिळणे शक्य झाले आहे. संबंधित अर्जाचा सर्व प्रवास हा ऑनलाईनच होतो. यात अर्ज सादर करणे त्यावर संबंधित लिपीकाने पडताळणी करणे, सक्षम अधिकारी यांनी डिजिटल स्वाक्षरी करणे हे सर्व ऑनलाईन होत असल्यामुळे वेळ वाचून सर्व काम पेपरलेस होण्यास मदत होत आहे. या प्रत्येक टप्प्यावर अर्जदारास मोबईल वर एसएमएस संदेश जातो. त्यामुळे अर्जदारास त्याच्या अर्जाची माहिती मिळते जिल्यातील सर्व महसूल अधिकारी यांच्या एचएसएस बेस बायोम्याट्रिक स्वाक्षरी तयार करण्यात आल्या असून एकाच वेळी अनेक दाखल्यावर स्वाक्षरी करणे शक्य होऊन सर्व महसुली सेवा या नागरिकांना केवळ ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीने वेळेवर त्यांच्या लॉगीन मध्ये प्रमाणपत्र प्रत देण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील अतिदुर्गम अश्या जिवती तालुक्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील तहसील सेतूचा सुध्दा यात समावेश आहे. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्याने 1 लाख 69 हजाराचेवर डिजिटल प्रमाणपत्रे नागरिकांना देऊन नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर तर ऑक्टोबर महिन्यात 31 हजार 492 प्रमाणपत्रे देऊन राज्यात तीस-या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यातील वरोरा तालुका आतापर्यंत 34 हजार प्रमाणपत्र देऊन अग्रस्थानी आहे.
विविध नागरिक सेवा प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी शासनाच्या आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या पोर्टलचा वापर करावा व हव्या असलेल्या प्रत्येक विभागाने सेवा अधिनियम 2015 व्दारे अधिसूचित केलेल्या नागरिक सेवा प्राप्त कराव्या. तसेच इतर सर्व विभागाच्या उर्वरित सेवा लवकरच ऑनलाईन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिली आहे.
000
No comments:
Post a Comment