Search This Blog

Thursday, 9 November 2017

चंद्रपूर महानगरात जिल्हा रूग्णालय परिसरात लवकरच अमृत दीनदयाल जेनेरीक फार्मसी सुरू होणार - ना. हंसराज अहीर


चंद्रपूर दि.9 नोव्हेंबर-  स्वस्थ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी, लोकांच्या जीवनात आनंद व चेह-यावर हसू आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून नवा उपक्रम हाती घेण्यात आला असून अमृत दीनदयाल वैद्यकीय शॉपच्या माध्यमातून जनसामान्यांना अल्पदरात औषधी उपलब्ध करण्यासाठी देशभरात 84 औषधी दुकाने सुरू करण्यात आली असून चंद्रपूर महानगरात येत्या 25 डिसेंबर रोजी या औषधी दुकानाचा शुभारंभ करण्याचा मानस होत असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री  हंसराज अहीर यांनी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये  दिली. 
सदर बैठकीस भारत सरकार अंगीकृत एचएलएल लाईफ केअर लिमी.चे वरीष्ठ प्रबंधक रेजी क्रिष्णा यु., चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. एम.जे. खान यांची उपस्थिती होती. 
या बैठकीत ना. हंसराज अहीर यांनी सांगितले की, सदर मेडिकल स्टोअर्स 24 तास रूग्णसेवेत उघडी राहणार असून या स्टोअर्समधून सर्वच आजावरील औषधी अल्प दरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात सुरू होत असलेल्या अमृत दीनदयाल मेडिकल्समध्ये एकूण 5 काऊंटर्स असणार आहेत. ज्यात 10 तज्ज्ञ केमिस्टांची नियुक्ती केली जाणार आहे. या मेडिकल शॉपमध्ये कंपनीद्वारा थेट जेनेरिक औषधींचा पुरवठा केला जाणार आहे. आपातकालिन परिस्थितीत रूग्णांना तातडीने औषधी पुरवठा होईल या अनुषंगाने सुध्दा या मेडिकल स्टोअर्समधून दक्षता घेतली जाणार आहे. 
अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअर्स 18 राज्यात केंद्र शासित प्रदेशांसह स्थापित झाले असून गुजरातमध्ये या स्टोअर्सची संख्या 52 आहे. महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी हे जेनेरीक औषधी केंद्र सुरू असून राज्य सरकार या केंद्राची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. दिल्लीत 4, चंदिगड 5, आसामात 7 व अन्यत्र मोठया प्रमाणात अमृत दीनदयाल मेडिकल्स सुरू असून या मेडिकल स्टोअर्समुळे सुलभ व अत्यल्प दरात औषधी उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहितीही ना. अहीर यांनी या बैठकीमध्ये दिली. 
31 जुलै 2017 पर्यंत देशातील सुमारे 30 लाख 68 हजार रूग्णांना अमृत अंतर्गत सेवा देण्यात आली आहे. 123 करोड 76 लाख रूपयांची औषधी या तारखेपर्यंत खरेदी करण्यात आले असून या औषधांमुळे 164 करोड 10 लाख रूपयांची बचत झाली असल्याचेही या बैठकीमध्ये सांगण्यात आले.
000

No comments:

Post a Comment