Search This Blog

Saturday, 18 November 2017

सामान्य जनतेला समाधान वाटेल अशी खड्डे मुक्त मोहीम राबवा - चंद्रकांत दादा पाटील



चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा
चंद्रपूर, दि.18 नोव्हेंबर – रस्ते दुरुस्ती, त्यातील तांत्रिक अडचणी व खड्डे दुरुस्ती मोहीम यामध्ये कारणमिमांसा न देता जनतेला समाधान वाटेल, अशा पध्दतीच्या खड्डे मुक्त मोहीमेला धडाक्याने पूर्ण करा. 15 डिसेंबरपर्यंत ही मोहीम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.
ना.चंद्रकांत दादा पाटील खड्डे मुक्त महाराष्ट्र मोहीमेसाठी 34 जिल्हयांच्या दौ-यावर आहेत. चंद्रपूर हा त्यांचा या मोहिमेतील 16 वा जिल्हा होता. तत्पूर्वी वर्धा जिल्हयात त्यांनी आज बैठक घेतली. 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डे मुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीनही विभागाचा आढावा त्यांनी आज घेतला. यावेळी व्यासपीठावर मुख्य अभियंता उल्हास डेबडवार, अवर सचिव करमरकर, आंतर वित्तीय सल्लागार मेश्राम, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे आदी उपस्थित होते. तर उपस्थितांमध्ये जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व पदावरील अभियंते, सहायक कर्मचारी वर्ग उपस्थित होता. बालपांडे यांनी चंद्रपूर जिल्हयात सुरु असलेल्या कामाचा आढावा सादरी करणामार्फत मांडला. जिल्हयातील 2510 कि.मी.लांबीच्या रस्त्यामध्ये 450 लहान मोठे पुल असून जवळपास 40 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महामार्गावरील खड्डे बुजविण्यामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणा-या चिमूर येथील उपविभागीय अभियंता श्री.टिकले, नागभिड उपविभागीय अभियंता श्री.कोठारी, सिंदेवाही येथील उपविभागीय अभियंता श्री.पुपरेड्डीवार यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दादा पाटील यांना सादरीकरण करतांना नियोजन भवनाच्या भव्यतेबद्दल व तांत्रिक वैशिष्ठयाबद्दल माहिती देण्यात आली. या नियोजन भवनाच्या निर्मिती प्रक्रियेत मोलाची भूमिका असणारे चंद्रपूरचे उपविभागीय अभियंता उदय भोयर, शाखा अभियंता चंद्रशेखर कोडगीलवार, स्थापत्य अभियंता संजय धारणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सामान्य कर्मचा-यांपासून वरिष्ठ अधिका-यांपर्यत सर्वांशी संवाद साधतांना मुंबईच्या वाररुमध्ये कशा पध्दतीने काम सुरु आहे, याची माहिती दिली. नागपूर व चंद्रपूरमध्ये नवनवीन उपाय योजना करुन काही जुन्या इमारतींचे आयुष्य दहा ते पंधरा वर्षानी वाढविण्यात आले आहे. तांत्रिक दृष्टया योग्य असणा-या या बांधकामाला नवे स्वरुप दिल्याबद्दल त्यांनी विभागाच्या कर्मचा-यांचे कौतुक केले. खड्डेमुक्त जिल्हा करण्यासाठी यावेळी काही तरुण अभियंत्यांनी वेगवेगळे उपाय सूचविले. तर काहींनी वेगळया सूचना केल्या. या सूचनांचे स्वागत करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिमा संवर्धनासाठी जनतेच्या या विभागातील सहभागाबद्दल आग्रही राहा, अशी सूचना त्यांनी केली. सामान्य जनतेला तांत्रिक बाबी माहिती नसल्यातरी त्यांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे खड्डेमुक्त अभियानात देखील काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र समाजातील विविध घटकातील दहा लोकांकडून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सरपंचापासून गृहीनी पर्यंत या मोहीमेमध्ये जनसहभाग घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
                                                                       0000

No comments:

Post a Comment