Search This Blog

Monday, 27 November 2017

टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने 80 कोटी रू. निधी खर्चून चंद्रपूर जिल्‍हयात कॅन्‍सर हॉस्‍पीटल उभारणार – सुधीर मुनगंटीवार




लाईफ लाईन एक्‍सप्रेस या आरोग्‍य विषयक उपक्रमाचा बल्‍लारपूरात शुभारंभ

चंद्रपूर, दि.27 नोव्हेंबर - लाईफ लाईन एक्‍सप्रेस हा उपक्रम गरीब, गरजू रूग्‍णांसाठी अतिशय महत्‍वाचा आहे. या उपक्रमाची संकल्‍पना जेव्‍हा माझ्यासमोर मांडली गेली तेव्‍हाच मी हा उपक्रम चंद्रपूर जिल्‍हयात राबविण्‍याचे ठरविले. आरोग्‍य या विषयाला मी नेहमीच अग्रक्रम व प्राधान्‍य दिले आहे. रूग्‍णसेवा हीच खरी ईश्‍वराची सेवा आहे या भावनेने मी या क्षेत्रात कार्यरत आहे. टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने सुमारे 80 कोटी रू. खर्चून सर्व सुविधांनी युक्‍त असे कॅन्‍सर हॉस्‍पीटल चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिकांच्‍या सेवेत लवकरच रूजु होणार आहे. आरोग्‍य सेवेचा हा वसा असाच अव्‍याहतपणे सुरू राहील अशी भावना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.
  27 नोव्‍हेंबर रोजी बल्‍लारपूर येथे भारतीय रेल्‍वे, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या सहकार्याने आणि महिंद्रा फायनान्‍स यांच्‍या सौजन्‍याने लाईफ लाईन एक्‍सप्रेस या आरोग्‍य विषयक उपक्रमाचा शुभारंभ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी झालेल्‍या जाहीरसभेदरम्‍यान वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वतीने चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नानाजी शामकुळे, आ. संजय धोटे, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. अंजली घोटेकर, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. पापळकर, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, महिंद्रा फायनान्‍सचे सुशील सिंग, विजय देशपांडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. 
  यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वतीने संबोधित करताना देवराव भोंगळे पुढे म्‍हणाले, मोठया प्रमाणावर आरोग्‍य विषयक उपक्रम आम्‍ही सातत्‍याने या जिल्‍हयात राबविल्‍या आहेत. मुल येथे आरोग्‍य महामेळावा, कर्करोग निदान शिबीर या उपक्रमांसह मोठया प्रमाणावर नेत्रचिकीत्‍सा शिबीरे आम्‍ही आयोजित केली. यामाध्‍यमातून 35 हजार नागरिकांना निःशुल्‍क चश्‍मे वितरीत केले. 5 हजार नागरिकांवर मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया केल्‍या. शेकडो नागरिकांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून शस्‍त्रक्रिया व उपचारासाठी मदत मिळवून दिली. या जिल्‍हयासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय कार्यान्‍वीत केले. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्‍णालयाला मंजूरी मिळाली, या ग्रामीण रूग्‍णालयाचे काम निविदा स्‍तरावर आहे. मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्‍य केंद्र मंजूर करण्‍यात आले. शिरडी संस्‍थानकडून 8 कोटी रू. किंमतीची एमआरआय मशीन मंजूर करण्‍यात आली. जिल्‍हयातील सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्र अद्ययावत करण्‍यासाठी योजना आखून मॉडेल आरोग्‍य जिल्‍हा म्‍हणून चंद्रपूर जिल्‍हा करण्‍याचा आमचा मानस आहे. सीएसआर च्‍या माध्‍यमातून मुल, चिचपल्‍ली, नांदगांव, बेंबाळ, धाबा, घुग्‍गुस, पडोली, बल्‍लारपूर, विसापूर, पोंभुर्णा, ज्‍येष्‍ठ नागरिक संघ चंद्रपूर येथील संस्‍थांना रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करून दिल्‍या. आरोग्‍य, शिक्षण, रोजगार या क्षेत्रात भरीव काम करण्‍याचा माझा मानस व संकल्‍प आहे, अशी भावना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
  बल्‍लारपूर येथील रेल्‍वे स्‍टेशनच्‍या प्‍लॅटफॉर्म नं. 1 वर लाईफ लाईन एक्‍सप्रेस चा शुभारंभ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फीत कापून केला. या लाईफ लाईन एक्‍सप्रेस मध्‍ये नेत्रांशी संबंधित उपचार व शस्‍त्रक्रिया, कानांशी संबंधित आजार व उपचार, फाटलेल्‍या ओठांची शस्‍त्रक्रि, कर्करोग निदान तसेच स्‍तन आणि गर्भाशयाचे कर्करोगाचे परिक्षण, परिवार नियोजन व आरोग्‍य सेवा याबाबतच्‍या उपायांची माहिती, मिरगी तसेच दंतचिकीत्‍सा व त्‍या संबंधीचे उपचार याबाबत उपचार व शस्‍त्रक्रिया तज्ञ डॉक्‍टरांच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार आहे यासाठी इम्‍पॅक्‍ट इंडिया या संस्‍थेच्‍या तज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
  रेल्‍वे स्‍थानकासमोरील झालेल्‍या जाहीरसभेत बोलताना बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर शहराचा चेहरामोहरा बदलत असल्‍याचे सांगत बस स्‍थानकाचे अत्‍याधुनिकीकरण व नुतनीकरण, अतयाधुनिक पोलिस स्‍टेशनचे बांधकाम, हरीत रेल्‍वे स्‍थानक, नाटयगृहाचे बांधकाम आदी विकासकामे प्रगतीपथावर असुन हे शहर राज्‍यातील प्रमुख विकसित शहर होणार असल्‍याचे सांगीतले.
  सतत लोककल्‍याणाचा विचार उराशी बाळगणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अनेक नागरिकांसाठी देवदूत ठरल्‍याची प्रतिक्रिया वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष  चंदनसिंह चंदेल यांनी व्‍यक्‍त केले. आ. नानाजी शामकुळे यांनी आपल्‍या भाषणात ना. मुनगंटीवार यांनी अर्थ व वनविभागाला नवी ओळख मिळवून दिल्‍याचे सांगत जनहितासाठी सीएसआर निधीचा वापर कसा करावा याचा आदर्श त्‍यांनी प्रस्‍थापित केल्‍याचे सांगीतले. आपल्‍या भाषणात आ. संजय धोटे यांनी आदिवासी व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांसाठी ना. मुनगंटीवार यांनी निधी देवून आदिवासींसाठी आरोग्‍यदायी निर्णय घेतल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
  यावेळी महिन्‍दा फायनान्‍सचे सुशील सिंग यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात सांगीतले की महिन्‍द्रा फायनान्‍स शिक्षण, आरोग्‍य, पर्यावरण या क्षेत्रावर विशेष भर देवून कार्यरत आहे. लाईफ लाईन एक्‍सप्रेस या उपक्रमाची संकल्‍पना आम्‍ही ना. मुनगंटीवार यांच्‍यासमोर ठेवली. त्‍यांनी घेतलेल्‍या पुढाकारातुनच हा उपक्रम चंद्रपूर जिल्‍यात राबविण्‍यात येत आहे. त्‍यांच्‍या वृक्ष लागवडीच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत महिन्‍द्रा फायनान्‍स सुध्‍दा वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेणार असल्‍याचे सांगीतले. यावेळी महिन्‍द्रा फायनान्‍सचे विनय देशपांडे यांनी सुध्‍दा आपले मनोगत व्‍यक्‍त केले. लाईफ लाईन एक्‍सप्रेस हा उपक्रम 30 नोव्‍हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत बल्‍लारपूर येथे राबविण्‍यात येत आहे. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 
0000

No comments:

Post a Comment