Search This Blog

Saturday 18 November 2017

जागरुक समाज निर्मीतीचे श्रेय पत्रकारीतेलाच – मनोहर गव्हाळ


जिमाअ व विदर्भ संपादक संस्थेतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
चंद्रपूर, दि.16 नोव्हेंबर – पत्रकारीतेचा मुळपिंड हा जागरुकता निर्माण करणे आहे. माहिती देणे, शिक्षित करणे हेच पत्रकारीतेचे प्रमुख कार्य असून भारतीय समाजाला जागरुक करण्याचे आणि लोकशाही बळकट करण्याचे कार्य पत्रकारीतेने केले असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय व विदर्भ संपादक, पत्रकार बहुउद्देशिय संस्था चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिन सोहळयात ते बोलत होते.
स्थानिक चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात आज राष्ट्रीय प्रेस दिन साजरा करण्यात आला. भारतीय प्रेस परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय प्रेस दिन साजरा केला जातो. यावर्षी ‘माध्यमासमोरील आवाहने’ हा विषय प्रेस परिषदेने निश्चित केला होता. या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर जेष्ठ पत्रकार यशवंत दाचेवार, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक डॉ.भाईदास ढोणे, विदर्भ संपादक संस्थेचे अध्यक्ष सयद रमजान अली, कार्यकारी अध्यक्ष शेख अनवरभाई उपस्थित होते.
यावेळी संबोधित करतांना मनोहर गव्हाळ यांनी भारतीय लोकशाहीमध्ये माध्यमांनी आपले दायित्व व जबाबदारी ओळखून समाज सुधारणेचे महत्वाचे कार्य केले आहे. त्यामुळेच पत्रकारीतेचे महत्व आणि पत्रकारीतेचा दरारा कायम आहे. पत्रकारांनी देखील आपल्या अभ्यासपूर्ण गुणवत्तेतून हा दर्जा कायम राखण्याची धडपड करायला हवी. वेगवेगळी माध्यमं आणि त्याचा उपयोग सकारात्मक होणे याचाच अर्थ समाजात मोठया प्रमाणात प्रबोधन होत आहे. त्यामुळेच जागरुक समाज निर्मितीचा आपला वसा कायम ठेवावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी बोलतांना भाईदास ढोले यांनी समाजाचा सामाजिक पुरुषार्थ जागविण्याचे कार्य पत्रकार करु शकतो. त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कार्यरत असावे, असा आशावाद व्यक्त केला.
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी माध्यमांसमोरील आवाहने या विषयावर बोलतांना सद्या समाज माध्यमांतून येणा-या माहितीला तपासण्याचे मोठे काम माध्यमांवर येवून पडले आहे. माहितीचा धबधबा समाज माध्यमांवर सुरु झाला आहे. मात्र बातमी खरी की खोटी हे जाणून घेण्याचे कसब अंगी बाळगणे व ते विकसीत करणे खरी कसोटी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत दाचेवार यांनी छोटया व मध्यम वृत्तपत्राच्या पत्रकार संपादकानी आपल्या वर्तमानपत्राची ओळख निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 20 ते 25 वर्षापूर्वी नवाकाळ, मराठा आदी वर्तमानपत्रे आपल्या निर्भिड अग्रलेखासाठी ओळखले जात होते. वर्तमानपत्र समाजाचा जसा आरसा असतो. तसाच तुमच्या वृत्तपत्रातील अग्रलेख हा संपादकाचा चेहरा असतो. त्यामुळे कोणत्याही काळात लिखानातूनच पत्रकाराची ओळख झाली पाहिजे. चारपानी नवाकाळ जर ही हुकूमत आजही गाजवू शकतो. तर स्थानिक दैनिकाला ही वाटचाल कठीण नाही. यावेळी पत्रकार व शायर सय्यद रमजान अली यांनीही मार्गदर्शन केले. शेख अनवर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन आरती दाचेवार यांनी केले. तर आभार रकिब अलीम शेख यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने पत्रकार उपस्थित होते.
                                                                                0000

No comments:

Post a Comment