पौनी व सिनाळा येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात बैठक
चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर – हक्काच्या जमिनी शासकीय प्रकल्पामध्ये गेल्यानंतर प्रकल्प पूर्ण करतांनाच नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी देखील प्रशासनाने जबाबदारीने पारपाडावी. नागरिकांना तातडीने मोबदला मिळावा. त्यांचे पूनर्वसन व्हावे यासाठी प्रशासनाने युध्दस्तरावर कार्यवाही करावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्त, त्यांच्या संघटना व वेकोली, जिल्हा प्रशासनातील शिर्षस्थ अधिकारी यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार ॲड.संजय धोटे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, वेकोलीचे महाव्यवस्थापक आर.के.मिश्रा, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी एम.आर.दयानिधी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) कल्पना निळ, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, तहसिलदार संतोष खांडरे, जिल्हा परिषद सदस्य सुनिल उरकुडे, राहूल सराफ, राजू घरोटे आदी उपस्थित होते.
यावेळी मसाळा तुकूम गांव यांच्या पूनर्वसनावर चर्चा झाली. याशिवाय वेकोलीतर्फे देण्यात येणारा मोबदला हा नव्या दरानुसार देण्यात यावा, विवाहित मुलींना देखील मोबदला मिळावा, पूनर्वसनाबाबचे निर्णय तातडीने व्हावे, अनुदानाची रक्कम सर्वांना सारखी राहावी, वेकोलीमध्ये शेतमजूरांना काम मिळावे, बाधीत कुटूंबाच्या पशुसाठी आर्थिक सहाय्य मिळावे, जुन्या घरांचे साहित्य वाहून नेण्यासाठी वाहतूक भाडे मिळावे, पूनर्वसन होईपर्यंत निर्वाह भत्ता मिळावा आदी अधिक मागण्या करण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थित असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची मांडणी वरिष्ठ अधिका-यासमक्ष केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांना त्यांनी आपल्या समस्या मांडायला सांगितले. जिल्हाधिका-यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्या असून तातडीच्या मदतीबाबत लगेच कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत दिले.
0000
4 डिसेंबर रोजी लोकशाही दिन
चंद्रपूर दि.29 नोव्हेंबर - सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्य नागरीक व शेतकरी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे तक्रार दाखल करतात.
डिसेंबर महिन्याचा पहिला सोमवार हा 4 डिसेंबर 2017 रोजी येत असल्यामुळे यादिवशी लोकशाही दिनाचे आयोजन नेहमीप्रमाणे दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाच्या प्रतीसह अर्ज सादर करावे. त्यानंतरच सदर तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल. या लोकशाही दिनात निवेदन स्विकारण्याची वेळ दुपारी 12.00 ते 1.00 वाजेपर्यंत राहील असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment