Search This Blog

Wednesday 29 November 2017

भद्रावती तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्रक खनिज विकास निधी अंतर्गत सादर करावे - ना. हंसराज अहीर


चंद्रपूर, दि.29 नोव्हेंबर- भद्रावती तालुक्यातील उपलब्ध असणा-या सर्व योजना पूर्णक्षमतेने कार्यरत करण्यात याव्या. रखडलेल्या योजनांचे सर्वेक्षण करुन गरज पडल्यास खनिज विकास निधीअंतर्गत यासंदर्भातील अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे दिले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भद्रावती पंचायत समिती सभागृहात आयोजित जनसंपर्क दिवस कार्यक्रमात उपस्थित अधिका-यांना पाणी पुरवठा योजनांमधील अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. तालुक्यातील चारही जिल्हा परिषद क्षेत्रातील बंद असलेल्या, पाणीस्त्रोत नसलेल्या, स्त्रोत उपलब्ध असूनही पर्याप्त पेयजल नसलेल्या सर्व योजनांचे तातडीने नियोजन करून पाणीपुरवठा योजनांचा नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी दिले. 
दि. 29 नोव्हेंबर रोजी आयोजित या जनसंपर्क दिन कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, पं.स. सभापती विद्या कांबळे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, जि.प.सदस्य यशवंत वाघ, जि.प. सदस्य प्रविण सूर, पं.स. सदस्य प्रविण ठेंगणे, नाजूका मंगाम, महेश टोंगे, नरेंद्र जिवतोडे, वरोराचे उपविभागीय अधिकारी भुसारी, तहसिलदार शितोडे, संवर्ग विकास अधिकारी तुपे, डॉ.एम.जे. खान, विजय राऊत, राहुल सराफ,  आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
या प्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. अहीर यांनी या तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्राक खनिज विकास निधी अंतर्गत सादर करावेत असे निर्देश उपस्थित अधिका-यांना दिले. पाणीपुरवठा योजना नागरिकांना सक्षमतेने उपलब्ध व्हाव्यात यासाठी भुजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत पाणी स्त्रोतांच्या उपलब्धतेसाठी सर्वेक्षण करवून तसे अहवाल तातडीने उपलब्ध होतील याचीही खबरदारी संबंधित अधिका-यांनी घ्यावी अशी सूचना केली. 
या तालुक्यातील नळ योजनांच्या सक्षमिकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे सांगत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व अन्य यंत्राणांनी तात्काळ आराखडा तयार करवून घेण्यासाठी स्वतः पुढाकार घेत आढावा घ्यावा असेही ना. अहीर यांनी या बैठकीमध्ये निर्देशित केले. 
पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसलेल्या पाणीपुरवठा योजनांची तसेच ही कामे पूर्ण झालेल्या योजनांची सविस्तर माहितीही संबंधितांनी त्वरित सादर करावी तसेच ज्या गावामध्ये पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी लोकांना पाणीटंचाईची अडचण निवारणार्थ टॅंकरद्वारा त्वरेने पाणीपुरवठा होईल अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना ना. अहीर यांनी यावेळी दिल्या. भद्रावती तालुक्यातील गाव पातळीवरून वाहणा-या नाल्यांद्वारे जलसंधारण व जलसंचय वाढीसाठी या सर्व नाल्यांची इत्यंभुत माहिती गोळा करून तसा अहवाल सादर करावा, या सर्व नाल्यांचे सीएसआर निधीतून खोलीकरण केले जाईल असेही ना. अहीर यांनी या कार्यक्रमात सांगितले. जनसंपर्क दिनास उपस्थित नागरिकांनी आपल्या अनेक समस्या ना. अहीर यांच्यापुढे कथन केल्या. लोकांनी विविधांगी समस्यांचे निवेदनेही सादर केले. उपस्थित अधिका-यांनी लोकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होईल या पध्दतीने कार्यवाही करावी अशा सूचनाही ना. अहीर यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमास भद्रावती तालुक्यातील अनेक गावातील नागरिक उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment